20 November 2019

News Flash

दलित तरुणाने बलात्कार केल्याने पीडित मुलगी ‘अशुद्ध’, गावाकडून सामाजिक बहिष्कार

बलात्कार करणारा तरुण दलित असल्याने, मुलीचं कुटुंब अस्पृश्य झालं असल्याचा अजब निकाल पंचायतीने दिला आहे

मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यतील एक अजब घटना समोर आली आहे. येथे एका मुलीवर दलित तरुणाने बलात्कार केला होता. याप्रकरणी गावातील पंचायतीने तुघलकी फर्मान काढलं आहे. बलात्कार करणारा तरुण दलित असल्याने, मुलीचं कुटुंब अस्पृश्य झालं असल्याचा अजब निकाल पंचायतीने दिला आहे. मुलीचं शुद्धीकरण करण्यासाठी पंचायतीने कुटुंबाला भंडाऱ्याचं आयोजन करण्याची शिक्षा सुनावली आहे. पंचायतीने दिलेला आदेश पूर्ण न करु शकणाऱ्या कुटुंबाने आपला सामाजिक बहिष्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

डूंगरपुरा गावात मार्च महिन्यात १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर गावातील तरुण सियाराम याने बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडित कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीला अटक करुन जेलमध्ये टाकलं आहे. पीडित कुटुंब अद्यापही धक्क्यातून सावरलेलं नसतानाच पंचायतीने त्यांच्याविरोधात अजब फर्मान काढलं आहे.

गरिबीमुळे करु शकले नाही भंडाऱ्याचं आयोजन –
पंचायतीने म्हटलं होतं की, मुलीसोबत बलात्कार करणारा दलित असल्याने पीडित मुलगी अशुद्ध झाली आहे. तिच्या शुद्धीकरणासाठी पित्याला गावात भंडाऱ्याचं आयोजन करावं लागेल. पंचायतीने फर्मान काढल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पैसे गोळा करत भंडाऱ्याचं आयोजन करण्याचा प्रयत्न केला. पण गरिबीमुळे त्यांना शक्य होऊ शकलं नाही. यामुळे त्यांचा सामाजिक बहिष्कार करण्यात आला. त्यांना आता कोणत्याच कार्यक्रमाला बोलावलं जात नसून, त्यांच्याकडेही कोणी येत नाही आहे.

पीडित मुलीच्या आई-वडिलांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार केली आहे. त्यांनी मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार पाठवली आहे. पोलिसांनी मात्र अद्याप आपल्याकडे याप्रकरणी पीडित कुटुंबाकडून लेखी तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे.

First Published on June 13, 2019 3:37 pm

Web Title: dalit man raped girl panchayat told family for purification in mp sgy 87
Just Now!
X