धर्मपरीवर्तन करून इस्लाम स्वीकारण्याची धमकी देणाऱ्या दलित युवकानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरनगरमधल्या काकडा या ठिकाणी ही घटना घडली आहे. सुदेश कुमार नावाच्या तरुणाने गावातल्या काही दांडग्या व्यक्तिंनी त्याची जमीन बळजबरी लाटल्याचा आरोप केला होता. यामुळे चिडलेल्या सुदेशने काही दिवसांपूर्वी इस्लाम स्वीकारण्याची धमकी दिली होती, असे सांगण्यात येत आहे.

ही घटना घडल्यानंतर काही दिवसांनी रविवारी रेल्वे गाडीसमोर उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रतिबंधात्मक कोठडीत ठेवले आहे व त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शांतता भंग करणे तसेच सार्वजनिक क्षेत्रामध्ये अव्यवस्था निर्माण केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

याआधी 10 फेब्रवारी रोजी सुदेश कुमार व त्याच्या कुटुंबातील काही जणांनी न्यायाधीशांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली होती. आम्हाला न्याय द्या अशा घोषणा देत त्यांनी न्यायाधीशांना साकडं घातलं होतं. आपली जमीन बेकायदेशीररीत्या काही दांडग्यांनी गिळंकृत केल्याचा आरोप त्यांनी केला होता. शहर न्यायाधीळ वैभव मिश्रा यांनी जमिनीशी संबंधित प्रकरण न्यायालयासमोर प्रलंबित असल्याचे सांगितले.

सुदेश कुमार यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशूनही एक खुलं पत्र लिहिलं आहे. जर माझ्या याचिकेवर सरकारी अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर आपण इस्लामता स्वीकार करू असं कुमार यांनी या पत्रात म्हटलं आहे. आपण अनेकवेळा तक्रारी करूनही स्थानिक पोलिसांनी आपली दखल घेतली नाही व काही कारवाई केली नाही असा आरोपही सुदेश कुमारनं केला आहे.