गुजरातमधील उनामध्ये दलित युवकाना झालेल्या मारहाणीचे देशभर पडसाद उमटल्यानंतर आता उनामध्ये जाऊन पीडित तरुणांची भेट घेण्यासाठी राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. एकामागून एक राजकीय नेते उनामध्ये जाऊन पीडितांची भेट घेत असून, या प्रकरणाचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचीही भर पडली आहे. अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सकाळी उनामध्ये जाऊन पीडितांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला. गुजरातमधील भाजपचे सरकार दलितविरोधी असून, दलितांचे खच्चीकरण करण्याचे काम या सरकारकडून केले जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केला. भाजपने आतापर्यंत ज्यांचे खच्चीकरण केले. तेच आता भाजप सरकारला धडा शिकवतील, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.
गुजरातमधील उनामध्ये गोरक्षक संघटनेच्या तरुणांनी चार दलित मुलांना अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे वळाले. गाईची हत्या करून तिचे कातडे काढल्याच्या आरोपावरून या तरुणांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद गेले तीन दिवस संसदेतही उमटले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत सरकारवर टीका केली. दलितांवरील अत्याचारावर गुरुवारी दुपारी राज्यसभेत अल्पकालीन चर्चाही झाली. या चर्चेमध्ये विरोधकांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. दलितांवर कायम अन्याय होतो. पण त्यांना न्याय कधीच मिळत नाही, अशी खंत यावेळी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी व्यक्त केली.