जेवणाला आपल्याआधी हात लावल्याच्या क्षुल्लक कारणावरुन दलित तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तरपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. मेजवानीसाठी सर्वजण एकत्र जमले असता आपल्याआधी जेवणाला हात लावला म्हणून करण्यात आलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. ७ डिसेंबरला ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “७ डिसेंबरला मेजवानीसाठी एकत्र आले असता देवराज या दलित तरुणाने जेवणाला आपल्या आधी हात लावल्याने आरोपींचा संताप झाला. यावेळी दोघांनीही देवराजला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत देवराज बेशुद्ध पडला. आरोपींनी त्याला त्याच्या घरी सोडलं असता काही वेळातच त्याचा मृत्यू झाला”.

आणखी वाचा- धक्कादायक! पतीसमोर १७ जणांनी पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

देवराजच्या कुटुंबाने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. भूरा सोनी आणि संतोष पाल अशी आरोपांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून शोध घेतला जात आहे.

छत्तरपूरचे एसएसपी समीर सौरभ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दोन्ही आरोपी देवराजच्या घऱी गेले आणि मेजवानीसाठी आपल्यासोबत घेऊन गेले. दोन तासांनी त्यांनी देवराजला घऱी सोडलं. आपल्याआधी जेवणाला हात लावला म्हणून त्याला मारहाण झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे”. पोलिसांना देवराजच्या शरिरावर जखमा आढळल्या आहेत. हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.