18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

गुजरामध्ये दलितांकडून मिशीवरील सेल्फी होताहेत शेअर; काय आहे यामागील कारण?

मिशी ठेवल्याने दलितांवर झाले होते हल्ले

नवी दिल्ली | Updated: October 4, 2017 11:21 PM

प्रोफाईल फोटो म्हणून ठेवण्यात येत असलेले छायाचित्र.

गुजरातमध्ये दलित तरुणाने मिशी ठेवल्याच्या कारणावरुन आणखी एक हल्ल्याची घटना घडली आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेत एका १७ वर्षीय मुलावर गांधीनगरमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी ब्लेडने वार केले होते.

यापूर्वीही मिशी ठेवल्याच्या कारणावरुन दोन दलित तरुणांना मारहाणी करण्यात आली होती. या घटनांमध्ये काही सवर्ण व्यक्तींवर मारहाणीचे आरोप करण्यात आले होते. गेल्या रविवारी आनंद जिल्ह्यात नवरात्रीच्या काळात गरब्यामध्ये सहभागी झाल्याने एका दलिताची बेदम मारहाण करीत हत्या करण्यात आली होती. दलितांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या या ताज्या घटनांनंतर सोशल मीडियातून मोठा विरोध सुरु झाला आहे. या घटनांना विरोध करताना लोक आपला मिशीवरील सेल्फी शेअर करीत आहेत.

गुजरामधील काही स्थानिक माध्यमांतील वृत्तानुसार, दलितांवर मिशी ठेवल्याच्या कारणावरुन हल्ले होत असल्याने या भागातील शेकडो तरुण व्हॉट्सअॅपवरील आपला डीपी बदलून मिशीचा डीपी ठेवत आहेत. या मिशीच्या छायाचित्राखाली मिस्टर दलित असे लिहीलेले असून मुकूटाचे चित्र देखील आहे. त्याचबरोबर फेसबुक आणि ट्विटरवर ‪#‎DalitWithMoustache‬ या हॅशटॅगच्या माध्यमातून प्रोफाईफ फोटोही बदलण्यात आले आहेत.

ट्विटरवर देखील युजर्स आपल्या मोठ्या मिशीसह छायाचित्रे ट्विट करीत आहेत. त्याचबरोबर आणखी काही तरुणांकडून आपल्या मिशीवाल्या अनेक मित्रांसोबत सेल्फी घेत दलितांवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधातील अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दलितांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मिशी रॅलीचे आयोजन करण्याचाही गुजरातमधील तरुणांचा विचार आहे. त्यानुसार, काही दलित नेते या आठवड्यात अहमदाबादेत या रॅलीचे आयोजन करु शकतात, असे माध्यमांतील वृत्तानुसार कळते.

First Published on October 4, 2017 11:14 pm

Web Title: dalit youth shares his selfie with moustache on social media