लोकसभेत अनुसुचित जाती, जमाती, मागासवर्ग, आदिवासी समाजावर जेव्हा चर्चा होते. तेव्हा आम्हाला बोलण्यास कमी वेळ दिला जातो. त्यामुळे बहुजन समाजाच्या खासदाराला आपले म्हणणे मांडता येत नसल्याची तक्रार भाजपा खासदार सावित्रीबाई फुले यांनी केली आहे. बहाराईच येथे धरणे आंदोलनात त्या बोलत होत्या.

बहुजन समाजातील लोक आपले म्हणणे मांडण्यात मागे नाहीत. मला वाटते आरक्षण वाचवण्यासाठी बहुजन समाजातील खासदारांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. नमो बुद्धाय जन सेवा समिती आयोजित धरणे आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. सावित्रीबाई फुले यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच स्वपक्षावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून अटक केलेली नाही. हा मुद्दा आपण लोकसभेत उपस्थित करणार आहोत. आरक्षण संपवण्याचा कट कोणत्याही परिस्थितीत साध्य करू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले.

आपला हक्क मागितल्यामुळे माझ्या प्रतिमेचे दहन केले जात आहे. एक नव्हे तर हजार पुतळे जाळा, मी घाबरणार नाही. मी बहुजन समाजाचा हक्क मागण्यासाठी तयार आहे आणि कायम तयार असेल. जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तुरूंगात असेल किंवा बाहेर पण बहुजन समाजासाठी लढाई लढतच राहीन, असे त्यांनी यावेळी म्हटले.

बहुजन समाजाची मुलगी असल्यामुळे माझे कुणी ऐकत नाही. मला गप्प बसण्यासाठी धमकी दिली जात आहे, दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जर आम्ही घाबरलो तर बहुजन समाजाचा अधिकार संपुष्टात येईल. पण अधिकारी मिळवण्यासाठी आम्हाला हुतात्मा व्हावे लागले तरी चालेल पण शांत बसणार नाही. बाबासाहेबांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी सातत्याने संघर्ष करू, असेही त्या म्हणाल्या.