दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. दिल्लीतील आयएएस आणि ‘दिल्ली, अंदमान अॅंड निकोबार आयलंड’ नागरी सेवेतील अधिकारी भाजपचीच बी-टीम असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. दिल्लीच्या नायब राज्यपाल हे पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या संपर्कात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिल्ली, अंदमान अॅंड निकोबार आयलंड नागरी सेवेतील विशेष सचिव यशपाल गर्ग आणि सुभाष चंद्र या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय केजरीवाल यांनी घेतला. त्याला विरोध करण्यासाठी दिल्ली सरकारचे २०० अधिकारी गुरुवारी सामुहिक रजेवर गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर टीका केली. दिल्ली, अंदमान अॅंड निकोबार आयलंड नागरी सेवेतील सामुहिक रजेवर गेलेल्या अधिकाऱ्यांच्या सभेतील माहिती नायब राज्यपाल स्पिकरफोनच्या माध्यमातून घेत होते, असाही आरोप त्यांनी केला.


सरकारी वकिलांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय दिल्लीच्या मंत्रिमंडळाने घेतल्यानंतरही त्या संबंधीच्या फाईल्सवर स्वाक्षरी करण्यास गर्ग आणि सुभाष चंद्र यांनी नकार दिला होता. त्यामुळे केजरीवाल यांनी त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा अधिकार दिल्ली सरकारला नसल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले. त्याचबरोबर ही कृती बेकायदा ठरवली आहे. केवळ दिल्लीचे नायब राज्यपाल केंद्र सरकारच्या परवानगीने दिल्ली, अंदमान अॅंड निकोबार आयलंड नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना निलंबित करू शकतात, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.