केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) हालचालींची गुप्त माहिती नक्षलवाद्यांना पुरविण्यात आल्यामुळेच त्यांना स्फोट घडवता आल्याचा अंदाज सीआरपीएफकडून व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून ही माहिती अंतर्गत किंवा बाह्य नक्की कोणत्या स्त्रोताकडून पुरविण्यात आली, याचा शोध घेतला जात आहे. जवानांच्या हालचालीची गुप्त माहिती फुटली आहे, हे नक्की आहे. कुठल्यातरी पातळीवर काही गोष्टी घडल्या आहेत. सीआरपीएफचे जवान या परिसरात कोणतीही पूर्वसूचना न देता आले होते. त्यामुळे ते साध्या वेषात असल्याची माहिती सीआरपीएफचे महासंचालक के. दुर्गाप्रसाद यांनी दिली.
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्य़ांतर्गत येणाऱ्या मलेवाडाच्या जंगलात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात बुधवारी सात जवान शहीद झाले होते. तेवाडापासून १२ किमी अंतरावर मालेवाडाच्या जंगलात सीआरपीएफ व स्थानिक पोलीस संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबवित होते. नक्षल शोधमोहीम आटोपल्यावर दुपारी तीनच्या सुमारास सीआरपीएफचे जवान टाटा-४०७ या वाहनाने दंतेवाडा-सुकमा मार्गाने सीआरपीएफच्या शिबिरात जात असतानाच या मार्गावर नक्षलवाद्यांनी आधीच पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाचा जोरदार स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की सीआरपीएफच्या वाहनाचे चार तुकडे उंच उडाले. वाहनातील सर्व सातही जवान शहीद झाले. त्यात सहायक उपनिरीक्षक विजय राज, प्रदीप तिरके, रूप नारायण दास, देवेंद्र चौरसिया, रंजन दास, सैदिने नाना उदयसिंग व जे. राजेंद्रन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, स्फोट ज्या ठिकाणी झाला तेथे तीन-चार फूट खोल खड्डा पडला.