गोरखा जनमुक्ती मोर्चाचे आंदोलन चिघळले; निदर्शक-पोलीस चकमक

स्वतंत्र गोरखालॅण्ड राज्याच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने (जीजेएम) सुरू केलेले आंदोलन आता चिघळत चालले असून या आंदोलनाला गुरुवारी हिंसक वळण लागले. निदर्शक आणि पोलिसांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली तर अनेक ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये या आंदोलनाच्या प्रमुखाशी संबंधित संकुलांमधून शस्त्रे हस्तगत करण्यात आली.

स्वतंत्र गोरखालॅण्डच्या मागणीमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे ऐन सुटीच्या मोसमांत हिंसाचार उसळल्याने त्याची झळ पर्यटन उद्योगालाही सहन करावी लागत आहे. दार्जििलगच्या डोंगराळ भागातील सध्याच्या स्थितीला राज्य सरकार जबाबदार आहे, पोलीस बळाचा वापर करून ते आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे जीजेएमचे सरचिटणीस रोशन गिरी यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारने राजकीय समस्या सोडवावी, असे ते म्हणाले. गुरुवारी जीजेएमची निमलष्करी दलासमवेत चकमक झडली आणि तुफान दगडफेक करण्यात आली, पोलिसांनीही दगडफेकीनेच त्याला प्रत्युत्तर दिले. त्यापूर्वी पोलिसांनी जीजेएमचे प्रमुख विमल गुरुंग यांच्याशी संबंधित संकुलांवर टाकलेल्या छाप्यांत ३०० शस्त्रे, स्फोटके हस्तगत केली. दार्जिलिंगच्या सिंगमारी आणि पाटलेबास परिसरांत टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली. स्वतंत्र गोरखालॅण्ड राज्य स्थापन होईपर्यंत आंदोलन थांबविण्यात येणार नसल्याचे गुरुंग यांनी स्पष्ट केले. पर्यटकांनी दार्जिलिंगला येणे टाळावे, असे आवाहनही गुरुंग यांनी केले आहे.