सलूनच्या दुकानात काम करणाऱया मुस्लिम न्हाव्याने लोकांची दाढी करणे हे मुस्लिम धर्मविरोधी असल्याचा फतवा दारुल उलूम देवबंदने काढला आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील बाजिया-उल-हक परिसरात मोहम्मद इरशाद आणि मोहम्मद फुरकान यांचे सलूनचे दुकान आहे. सलूनमधील कामाविषयी मदरसा दारूल उलूमने आपल्याला दिशा निर्देश करावे, अशी मागणी या दोघांनी केली होती. त्यावर दारुल उलूम देवबंदचे तीन मौलवी फकरुल इस्लाम, वकार अली व जैनूल कासमी यांनी फतवा जारी केला. लोकांची दाढी करणे किंवा त्यांच्या दाढीचे केस कापणे हे मुस्लिम धर्माच्याविरोधी असून सलूनच्या दुकानात काम करणाऱया मुस्लिमांनी आता नवा रोजगार शोधायला हवा, असे हा फतवा सांगतो.
दरम्यान, मौलवींना सुनावलेला फतवा मान्य असून यापुढे कोणाचीही दाढी करणार नसल्याचे सलूनचे मालक इरशाद आणि मोहम्मद यांनी ठरविले आहे. तर मौलवींनी काढलेल्या फतव्याबाबत अद्याप कोणतीही माहिती नसून जेव्हा माहित होईल तेव्हा काय करायचे? ते ठरवू असे लखनऊमध्ये सलून चालवणाऱया एका मुस्लिम तरुणाने म्हटले आहे.
यापूर्वीही दारुल देवबंदने असे अजब फतवे काढले आहेत. मुस्लिम समाजातील लोकांनी स्वतःचे छायाचित्र काढणे धर्मविरोधी कृत्य आणि पाप असल्याचा फतवा दारूल उलूम देवबंदने याआधी काढला होता. पारपत्र किंवा ओळखपत्राशिवाय अन्य कोणत्याही कारणांसाठी मुस्लिमांनी स्वतःचे छायाचित्र काढू नये. निकाहाच्यावेळी छायाचित्रण करण्याला इस्लाममध्ये परवानगी नाही. त्याचबरोबर पुढच्या पिढीसाठी स्वतःची छायाचित्र जपून ठेवणेही इस्लाममध्ये मान्य नाही, असे फतव्यात नमूद करण्यात आले होते.