मुस्लिम महिलांनी नेलपॉलिश लावणे हे इस्लामविरोधी असल्याचे सांगत त्याविरोधात एक फतवा काढण्यात आला आहे. दारुल उलुम देवबंद या संस्थेने हा फतवा काढला आहे. मुस्लिम महिलांनी नखांवर नेलपॉलिश लावणे हे इस्लाममध्ये मान्य नाही तसेच ते बेकायदा आहे. मुस्लिम महिलांनी नखांवर मेहंदी लावावी पण नेलपॉलिश नाही असेही या संघटनेने म्हटले आहे. मुफ्ती इशरार गरुआ यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा फतवा लागू केल्याचे म्हटले आहे.

दारुल उलुम देवबंद आणि त्यांनी जारी केलेले वादग्रस्त फतवे

दारुल उलुम देवबंद ही एक शैक्षणिक संस्था आहे. जगभरातल्या मुस्लिमांच्या मनात या संस्थेबद्दल विशेष आदर आहे. मात्र त्यांच्या अशा काही फतव्यांमुळे त्यांच्यावर टीकाही होताना दिसते. ऑक्टोबर २०१७ मध्येही याच संस्थेने एक फतवा काढला होता ज्यानुसार मुस्लिम महिलांनी केस कापणे आणि ब्युटी पार्लरमध्ये जाणे हे इस्लामविरोधी असल्याचे त्यांनी म्हटले होते. जानेवारी २०१८ मध्ये चमकणारा बुरखा घालू नये ते इस्लाम विरोधी असल्याचेही या संस्थेने म्हटले होते.

ऑक्टोबर २०१७ मध्ये याच संस्थेने दिलेल्या फतव्यानुसार सोशल मीडियावर मुस्लिम स्त्रियांचे आणि पुरुषांचे फोटो पोस्ट करणं हराम असल्याचं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा ही संस्था त्यांच्या नव्या फतव्यामुळे चर्चेत आली आहे. ज्यानुसार महिलांनी नेलपॉलिश लावू नये असे या संस्थेने म्हटले आहे. तसा फतवा काढण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे.