भारतात विविधतेत एकता असल्याचे आपण म्हणतो. सणावारांच्या निमित्तानेही हे दिसून येते देशातील विविध राज्यांमध्ये विजयादशमीचा सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. बंगालमध्ये दुर्गापूजा म्हणून प्रसिद्ध असणारा हा सण गुजरात आणि राजस्थानमध्ये दांडिया तसेच गरबा या नृत्यप्रकारासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही खान्देश, विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागांमध्ये विजयादशमी साजरी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात असणारी देवीची मंदिरेही भारताची शान आहेत असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

पंजाबमध्ये नऊ दिवस उपवास करुन हे व्रत केले जाते. यावेळी पाहुण्यांना पारंपारिक मिठाई प्रसाद म्हणून दिली जाते. याशिवाय रावणदहनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. बंगाल, ओडिसा आणि आसाममध्ये हा सण दुर्गापूजेच्या रुपात साजरा केला जातो. बंगालमध्ये हा सण पाच दिवस साजरा केला जातो. दुर्गादेवीच्या प्रतिष्ठापनेसाठी भव्य मंडप घातले जातात. तसेच या मूर्ती तयार करण्यासाठी देशातील नामवंत कलाकारांना बोलविण्यात येते.

तामिळनाडू आणि कर्नाटकात लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या तीन देवींची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस धन आणि दागिन्यांची पूजा केली जाते. त्यापुढील तीन दिवस कला आणि विद्येला पुजले जाते तर शेवटचे तीन दिवस देवीला पुजले जाते. कर्नाटकातील म्हैसूरमधील दसरा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. या मुहूर्तावर एकमेकांना कपडे देऊन नातेवाईकांमध्ये हा सण साजरा केला जातो. तसेच विद्यार्थी नवीन गोष्ट शिकण्यास या काळात प्रारंभ करतात. फुले आणि दिव्यांनी घर तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर सजवला जातो. गुजरातमध्ये देवीची पूजा आणि आरती झाली की गरबा आणि दांडिया खेळले जाते. याबरोबरच हिमाचल प्रदेश आणि काश्मिरमध्येही हा सण अतिशय आनंदात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. हिडींबा देवीची एक मोठी पालखी निघते. त्या शहरातील इतर लहान लहान मंडळांच्या पालख्या या पालखीच्या मागे मार्गस्थ होतात. यावेळी लोक एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात.