News Flash

Rafale Deal : “कोणताही घोटाळा झालेला नाही”, फ्रान्सच्या Dassault ने फेटाळले आरोप!

राफेल करारासाठी मध्यस्थाला १० लाख युरो दिल्याच्या आरोपावर Dassault कडून खुलासा करण्यात आला आहे.

राफेल विमानांच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे आरोप अनेक वर्षांपासून केले जात आहेत. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी फ्रेंच ऑनलाईन जर्नल Mediapart ने केलेल्या आरोपांची भर पडली आहे. Rafale करारामध्ये डसॉल्टने एका भारतीय मध्यस्थाला सुमारे १० लाख युरो दिल्याचा खळबळजनक दावा मिडीयापार्टने आपल्या वृत्तात केला होता. त्यामुळे या मुद्द्यावरू न पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती. मात्र, असा कोणताही घोटाळा झाला नसल्याचं डसॉल्टने ठामपणे म्हटलं आहे. आपल्या या दाव्यासाठी डसॉल्टकडून फ्रान्समधल्या अनेक संस्थांकडून केल्या जाणाऱ्या तपासणीचा हवाला दिला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

डसॉल्टनं दिला सरकारी यंत्रणांचा हवाला!

Mediapart ने आपल्या वृत्ताला फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी कारवाया करणारी संस्था Agence Francaise Anticorruption (AFA) ने केलेल्या तपासाचा आधार दिला आहे. त्यामुळे यामध्ये तथ्य असल्याचं बोललं जात आहे. मात्र, हे सर्व आरोप डसॉल्टने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. “सरकारी अधिकारी, फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था यांनी मिळून या कराराचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा घोटाळा झाल्याचं सापडलेलं नाही. भारताला ३६ राफेल विमानं देण्यासंदर्भातल्या करारात कोणताही गैरप्रकार झालेला नाही”, असं डसॉल्टकडून सांगण्यात आलं आहे.

राफेल व्यवहारात दलाली!

“२००० सालापासूनच डसॉल्टने भ्रष्टाचार, नैतिक तत्व, बाजारातली आपली पत राखण्यासाठी अंतर्गत प्रक्रिया सुरू केली आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट अर्थात OECD चे सर्व नियम आणि करार आम्ही पाळतो”, असं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, ज्या मध्यस्थाला ही रक्कम देण्यात आली आहे, त्याचं नाव सुशेन गुप्ता असं सांगितलं जात आहे. या व्यक्तीची आधीच ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. AFA कडून डसॉल्टच्या २०१७च्या वार्षिक अहवालाची तपासणी केली जात असताना हा प्रकार समोर आल्याचं देखील मीडियापार्टनं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 4:26 pm

Web Title: dassault clarification on mediapart report about middleman in rafale deal pmw 88
Next Stories
1 धक्कादायक! करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, चूक लक्षात येताच…
2 लसींची निर्यात थांबवा; राहुल गांधींचं मोदींना पत्र
3 “त्याला करोना झालाय, मला नाही,” रुग्णाला घेऊन जाणारा कर्मचारी ज्यूस सेंटरवर थाबंल्याने नागरिक अवाक
Just Now!
X