भारतीयांची वैयक्तिक माहिती अवैधरीत्या गोळा केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) फेसबुक, केम्ब्रिज अॅनालिटिका आणि ग्लोबल सायन्स रिसर्च या कंपन्यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रातून युजर्सची माहिती अवैधरीत्या गोळा केल्यासंबंधीचे तपशील देण्यास सांगण्यात आलं आहे.

गेल्या महिन्यात केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार सीबीआयने केम्ब्रिज अॅनालिटिका आणि ग्लोबल सायन्स रिसर्चविरोधात डेटा लिक प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. केम्ब्रिज अॅनालिटिकाने ग्लोबल सायन्स रिसर्चकडून हा सर्व डेटा मिळवला असा आरोप आहे. सीबीआयकडून सध्या या कंपन्यांची प्राथमिक चौकशी सुरू आहे, हे पत्र म्हणजे त्याचाच एक भाग आहे. कंपन्यांकडून उत्तर आल्यानंतर या प्रकरणाची एफआयआर दाखल करून चौकशी करावी की न करावी, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

अमेरिकेच्या २०१६मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी फेसबुकवरील सुमारे आठ कोटी ७० लाख वापरकर्त्यांच्या माहितीचा उपयोग केल्याचा आरोप केम्ब्रिज अॅनालिटिकावर यापूर्वी करण्यात आला होता. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीची कार्यालये न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लंडन, ब्राझिल आणि मलेशियामध्ये आहेत. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ही मोठ्या प्रमाणावर डेटा पुरवणारी कंपनी आहे. या कंपनीचे संस्थापक क्रिस्टोफर वाइली यांनी २०१६ मध्ये या कंपनीच्या काम करण्याच्या पद्धती समोर आणल्या होत्या. २०१४ मध्येच वाइली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांनी एक धक्कादायक बाब समोर आणली होती. त्यांच्या दाव्यानुसार ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा बेकायदा पद्धतीने मिळवण्यात आला होता. लिक करण्यात आला होता. या बातमीमुळे इंटरनेट जगतात मोठी खळबळ माजली.