भारतीय अंतराळ संसोधन संस्था अर्थात इस्रोची महत्वाकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेची चाचणी अखेरच्या टप्प्यात आली असून तामिळनाडूच्या महेंद्रगिरी आणि बंगळूरूच्या ब्यालालू येथे ही चाचणी सुरु आहे. येत्या ९ जुलैपासून या मोहिमेचे लॉन्चिंग करण्याचा इस्रोचा मानस आहे. इस्रोच्या वेळापत्रकानुसार, या मोहिमेवर जाणारे अंतराळयान १९ जून रोजी बंगळूरू येथून रवाना होईल त्यानंतर ते २० किंवा २१ जूनला श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावर पोहोचेल. त्यानंतर येथून त्याचे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण होईल.

चंद्रावर गेल्यानंतर थ्रीडी मॅपिंगच्या माध्यमातून तिथल्या पाण्याच्या रेणूंची तपासणी, खनिजांची तपासणी त्याचबरोबर ज्या ठिकाणी आजवर कोणीही पोहोचलेले नाही अशा चंद्राच्या बाजूवर यान उतरवणे यासाठी इस्रोने मोठी तयारी केली आहे. मात्र, या महत्वाकांक्षी मोहिमेपुढे अनेक आव्हानेही आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

पृथ्वीपासून चंद्राचे अंतर ३,८४४ लाख किमी आहे. यामध्ये यानाचे प्रक्षेपण अचूकता अंतर ही महत्वाची गोष्ट आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा यावर परिणाम होतो. त्याचबरोबर चंद्रावर इतर खगोलीय संस्थांचा वावर असून सुर्याच्या अतिनील किरणांचाही परिणाम यावर होणार आहे.

त्याचबरोबर संवाद साधताना होणारा उशीर ही देखील या मोहिमेतील एक मोठी समस्या आहे. पृथ्वीवरुन कोणताही संदेश पाठवला तर तो यानापर्यंत पोहोचताना काही मिनिटं लागू शकतात. त्याठिकाणी संदेशासाठीचे रेडिओ सिग्नल्स कमजोर असू शकतात. त्याचबरोबर या संवादादरम्यान होणारा वातावरणाचा आवाजही यावर परिणाम करु शकतो.