बलात्काराच्या प्रयत्न करणाऱ्या वडिलांची २६ वर्षीय मुलीने कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बुधवारी ही घटना घडली आहे. विवाहित असणाऱ्या आरोपी मुलीला अटक करण्यात आली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने घरी आली असताना हा प्रकार घडला.

‘घटनेच्या रात्री मुलगी कार्यक्रमातून आल्यानंतर घरी झोपली होती. यानंतर काही वेळाने तिचे वडील खोलीत आले आणि बळजबरी करु लागले. मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता वडिलांनी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली’, अशी माहिती एका स्थानिकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे. घटना घडली तेव्हा घरात दोघेच होते असंही त्या व्यक्तीने सांगितलं आहे.

‘विरोध करत असताना मुलीने घराच्या कोपऱ्यात ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि एकामागोमाग एक वार केले. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला. काही वेळाने इतर नातेवाईक आले तेव्हा त्यांनी मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचं पाहिलं. चौकशी केली असता मुलीने घडल्या प्रकाराची माहिती दिली’, असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान पोलिसांनी घटनेला दुजोरा दिला असून नेमकं कारण काय आहे याचा तपास करत असल्याचं सांगितलं आहे. ‘आम्हाला नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. पण दोघांमध्ये वाद झाला आणि मुलीने कुऱ्हाडीने वार केले असल्याची माहिती मिळाली आहे. कुऱ्हाडीचा एक वार फार गंभीर असल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला’, असं पोलिसांनी सांगितलं आहे.