इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेत पाच वर्षांपूर्वी सहभागी झालेल्या केरळमधल्या दोन मुलींना सोडवण्यासाठी त्यांच्या आयांची सध्या धडपड सुरु आहे. या मुलींनी या संघटनेत सहभागी होण्यासाठी भारत सोडला. मात्र, त्या आता अफगाणिस्तानच्या कैदेत आहेत. या दोन्ही मुलींच्या आया त्यांना परत घरी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

या दोघींपैकी निमिषा उर्फ फातिमा ईसा हिची आई बिंदु संपत हिने सोमवारी केरळ उच्च न्यायालयात आपली याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या माध्यमातून तिने केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे आपली मुलगी आणि नात यांना परत भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. तर याच दिवशी मिनी, ज्या मेरिन उर्फ मिरियम हिच्या आई आहेत, त्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, जर त्यांच्या मुलीने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा त्याग केला असेल आणि तिला तिच्या कृत्याबद्दल पश्चाताप होत असेल, तरच तिला परत भारतात आणायला हवं.

कोचीच्या रहिवासी असलेल्या मिनी म्हणाल्या, माझ्या मुलीचं सध्या यासंदर्भात काय मत आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तिला पश्चाताप होतोय की ती समाधानी आहे हे जाणून घ्यायचं आहे. आमच्यासाठी देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषय हा अधिक महत्वाचा आहे. मुलींनी केलेली गोष्ट चुकीचीच आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी होणं हा गुन्हाच आहे. त्यांना जर माणूस म्हणून इतरांवर प्रेम करण्यासाठी परत येण्याची इच्छा असेल, तरच त्यांना परत आणलं जावं.

निमिषा या हिंदू मुलीने तर मेरिन या ख्रिश्चन मुलीने इस्लाम धर्माचा स्विकार केला होता आणि इस्लाममध्येच धर्मांतरीत झालेल्या दोन ख्रिश्चन मुलांशी लग्न केलं होतं. २०१६ मध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या २१ महिला आणि पुरुषांच्या गटाने भारत सोडला, त्यामध्ये या दोघीही होत्या.

सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गट इस्लामिक स्टेट संघटनेच्या अखत्यारित असलेल्या अफगाणिस्तानमधल्या नंगरहार भागामध्ये गेला. या दोन मुलींचे नवरे तसंच या गटातले काही पुरुष अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात मारले गेले असावेत असा अंदाज आहे. तर या पुरुषांच्या पत्नींना अफगाणिस्तान सरकारने परत आणलं.