वकिलांची संमती

मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याशी संबंधित असलेला पाकिस्तानी वंशाचा लष्कर ए तोयबाचा अमेरिकी अतिरेकी असलेला डेव्डीड हेडली याचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जाबजबाब घेण्यास परवानगी दिली जाईल, असे त्याचे वकील जॉन थेस यांनी सांगितले. मात्र, असे असले तरी अमेरिकेच्या न्याय खात्याने परवानगी दिली तरच त्याचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने जाबजबाब घेता येतील.
त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मी त्याबाबतच्या बातम्या वाचल्या आहेत, टाडा न्यायालयाने १० डिसेंबरला हेडलीचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जाबजबाब घेण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या हेडली अमेरिकेत पस्तीस वर्षे तुरूंगवासाची शिक्षा भोगत आहे.
मार्च २०१० मध्ये अमेरिकेत त्याला दोषी ठरवण्यात आले होते तेव्हा असे मान्य करण्यात आले होते की, अमेरिकी वकिलांच्या कार्यालयाने आदेश दिल्यास तो परदेशातील न्यायालयीन प्रक्रियेत जाबजबाबास सामोरा जाईल. विनंती पत्र किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या दोन मार्गानी त्याचे जाबजबाब होऊ शकतात. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्यात हेडलीने सर्व कट आखला होता, त्यात १६६ लोक ठार झाले होते; त्यात सहा अमेरिकी लोकांचा समावेश होता. लष्कर ए तोयबाने मुंबईत जो हल्ला केला होता त्यातील ठिकाणांची रेकी डेव्हिड हेडली याने केली होती.