लोकांच्या पाठिंब्यामुळेच बोडो शांतता करारावर स्वाक्षऱ्या होऊ शकल्या त्यामुळे आता आसाममध्ये शांततेची नवी पहाट उगवली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

बोडो शांतता करारानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, या करारामुळे आसाममध्ये चिरकाल शांतता नांदण्याची आशा आहे. आता ईशान्येकडील शांतता व विकासासाठी सर्वानी एकत्र काम करण्याची गरज आहे. आसाम व ईशान्येकडील राज्यात हिंसाचार पुन्हा सुरू होऊ देणार नाही. ईशान्येकडील अतिरेकी, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी यांनी बोडो बंडखोरांकडून प्रेरणा घेऊन मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकत्व कायद्याबाबत अफवा पसरवल्या जात असून या कायद्यामुळे परदेशातील लाखो निर्वासित राज्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे पण ते खरे नाही असे सांगून ते म्हणाले, की बोडो करार यापूर्वी १९९३ व २००३ मध्येही झाले पण त्यामुळे बोडो बहुल क्षेत्रात शांतता निर्माण झाली नाही. आताच्या करारामुळे सर्व घटकांचा विजय झाला असून त्यात कुणाचाही तोटा नाही.