कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची गणना दहशतवादी म्हणून केली जाते. अंडरवर्ल्डमध्ये दाऊद इब्राहीमचाच दबदबा आहे. पण याच दाऊदला त्याच्याच एका हस्तकाने गंडा घातला आहे. हा गंडा काही लाखांचा नसून तब्बल ४० कोटी रुपयांनी दाऊद इब्राहिमला गंडवण्यात आले आहे. डी कंपनी आपल्यावर मागावर असल्याचे लक्षात येताच दाऊदच्या या साथीदाराने धूम ठोकली आहे.
सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार दाऊदचा हस्तक खालीक अहमदला दिल्लीतील एका व्यावसायिकाकडून ४५ कोटी रुपये घ्यायचे होते. यातील ४० कोटी त्याला परदेशात पाठवायचे होते. तर उर्वरित पाच कोटी रुपये त्याला बक्षीस म्हणून मिळणार होते. खालीकने ४५ कोटी रुपये घेतले खरे मात्र यातील एकही रुपया परदेशात गेला नाही. दाऊदचा हस्त जबीर मोती आणि खालिक अहमद यांच्यामधील संभाषणातून गुप्तचर यंत्रणांना ही माहिती मिळाली आहे. हे दोघेही शारजा आणि भारतातून हवालामार्गे पैसे परदेशातल्या बँकांमध्ये जमा करायचे. यातील संभाषणात खालीक अहमदने पैशांवर डल्ला मारल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. पैसे जमा करणा-याने गोंधळ घातल्याने पैसे बँकेत अडकले. पण हे पैसे पनामातील बँकेत जमा होतील असा दावाही त्याने केला. या ४० कोटींपैकी काही पैसे पनामातील बँकेत आणि काही पैसे दाऊदच्या व्यवसायात गुंतवले जाणार होते.
खलीकने पैशांमध्ये अपहार केल्याचे समोर येताच डी कंपनीतील दोघांनी दिल्लीहून कॅनडात जाऊन या प्रकरणाची चौकशीही केली होती. डी कंपनीच्या हस्तकानेच पैशांची अफरातफर केल्याने डी कंपनीच्या प्रतिमेला तडा गेला. त्यामुळे दाऊदने खलीकचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली. दाऊद आपल्या मागावर आहे हे लक्षात येताच खालीकने पसार झाला आहे. सध्या तो मणिपूरमध्ये लपला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागलेल्या संभाषणातून शस्त्रास्त्रांचा व्यवसाय, खंडणी, हिरे, अंमलीपदार्थांसोबतच काळा पैशाच्या व्यवहारातही डी कंपनी सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दाऊदचे हस्तक दिल्ली, मुंबई आणि देशाच्या अन्य महत्त्वाच्या शहरांमधून पैसे घेतात. हवालाच्या माध्यमातून हे पैसे पनामा, कॅनडा, दुबई आणि पाकिस्तानमध्ये पाठवतात. तिथून हे पैसे बँक खात्यांमध्ये जमा होतात. तर काही वेळेला हे पैसै दाऊदच्या व्यवसायातही गुंतवले जातात. काही वर्षांनी हे पैसे पुन्हा भारतात पाठवले जातात.
दाऊदच्या हस्तकानेच त्याला चूना लावल्याने दाऊदची दहशत संपल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. यापूर्वीही छोटा राजन आणि अन्य महत्त्वांच्या लोकांना ठार मारण्यासाठी छोटा शकीलने शूटर्सना सुपारी दिली होती. पण शूटर्सचा नेम चुकला आणि दाऊद कंपनीला लाखोंचा फटका बसला.