१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा सुत्रधार आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच लपून बसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी लोकसभेत दिली. दाऊद पाकिस्तानात असल्याची माहिती आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. यासाठी दाऊदचे पासपोर्ट आणि तो पाकिस्तानात वास्तव्याला असलेल्या अनेक ठिकाणांचा दाखला सूत्रांकडून देण्यात आल्याचेही राजनाथ यांनी सांगितले. आम्ही पाकिस्तान सरकारला याबाबतची माहिती दिली असून दाऊदला लवकरात लवकर शोधून काढण्यात यावे, असेही भारतातर्फे पाकिस्तानला सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच दाऊदच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी दाऊद इब्राहिम याचा ठावठिकाणा माहिती नाही, असे लेखी उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी लोकसभेत दिल्याने वाद निर्माण झाला होता. सरकारला दाऊद इब्राहिम याचा ठावठिकाणा माहिती नाही, तो माहिती झाल्यावर त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे चौधरी यांनी लेखी उत्तरात म्हटले होते. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर भूमिका बदलल्याची टीका करत भाजपची चांगलीच कोंडी केली होती. टीकेचा हा भडिमार थांबविण्यासाठी राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत यासंबंधीचे निवेदन दिले.