भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमचा गुन्हेगारी विश्वातला अंडरवर्ल्ड डॉन बनण्यापर्यंतचा प्रवास बी.व्ही. कुमार यांनी ‘डीआरआय अँड द डॉन्स’ या आपल्या नव्या पुस्तकातून उलगडला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाचे माजी महासंचालक राहिलेल्या बी.व्ही.कुमार यांनी दाऊदचा गुन्हेगारीचा प्रवास जवळून पाहिला आहे. दाऊद दिसायला अत्यंत सामान्य भित्रा माणूस होता. संघटित गुन्हेगारीमध्ये सहभागी असल्याची त्याने कबुलीही दिली होती असे कुमार यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.

अंडरवर्ल्डमध्येच सक्रीय असलेल्या राशीद अर्बा नावाच्या व्यक्तीने त्यांना दाऊदच्या ठावठिकाण्याबद्दलची माहिती दिली होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांच्या बहिणीबरोबर राशीद अर्बाचे लग्न झाले होते. दक्षिण आशियातील अंडरवर्ल्डची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी डीआरआयचे योगदान लक्षात आणून देण्यासाठी बी.व्ही. कुमार यांनी ‘डीआरआय अँड द डॉन्स’ हे पुस्तक लिहिले आहे. जुलै १९८३ साली आम्ही दाऊदला ताब्यात घेतले होते.

डीआरआयने त्याच्या विरोधात COFEPOSA अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. दाऊदच्या अटकेनंतर गुजरात उच्च न्यायालयात एक याचिका सुनावणीसाठी आली. दाऊदच्या तात्काळ सुटकेसाठी त्याच्यावतीने राम जेठमालानी कोर्टात हजर होते असे कुमार यांनी सांगितले. जामिनावर सुटका झाल्यानंतर तो दुबईला पळून गेला. COFEPOSA प्रकरणात डीआरआय आजही दाऊदच्या शोधात आहे. ८० च्या दशकात बी.व्ही.कुमार अहमदाबादमध्ये कस्टम आयुक्त होते.

त्यावेळी दाऊद इब्राहिम आणि करीम लाला गँगमध्ये मोठया प्रमाणावर गँगवॉर सुरु होते. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या शांततेला धोका निर्माण झाला होता. समाजामध्ये भिती होती. पुस्तकामध्ये गुजरात-मुंबई प्रवासात दाऊदला गोळी लागल्याचा एक किस्सा आहे. दाऊद एकदा पोरबंदरहून कारने मुंबईला येत होता. त्यावेळी त्याच्या सहकाऱ्याने आलमजेबला मारण्यासाठी झाडलेली गोळी अपघाताने दाऊदला लागली होती. आलमजेब डी कंपनीचा कट्टर शत्रू होता. गोळी दाऊदच्या मानेला लागली होती. पण दुखापत गंभीर नव्हती. दाऊदला लगेच बडोद्याच्या सयाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मला याबद्दल समजल्यानंतर मी लगेच बडोद्याचे पोलीस आयुक्त पी.के.दत्ता यांच्याशी बोललो असे कुमार यांनी पुस्तकात लिहिले आहे.

त्यानंतर चौकशीमध्ये दोन नंबरचे बेकायद धंदे करत असल्याची दाऊदने कबुली दिली होती. तो माझ्या बरोबर हिंदीमध्ये बोलत होता. मला तो एक सामान्य माणसासारखा वाटला. दत्ता यांच्या कार्यालयात अर्धातास आम्ही त्याची चौकशी केली. त्यानंतर मी अहमदाबादला गेलो आणि COFEPOSA अंतर्गत दाऊदला ताब्यात घेण्याचे वॉरंट मिळवले असे कुमार यांनी पुस्तकात लिहिले आहे.

दाऊद आशिया खंडातील धोकादायक अंडरवर्ल्ड डॉन कसा बनला ? या प्रश्नावर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामागे मूळ कारण असल्याचे कुमार यांनी सांगितले. कुमार यांच्या मते दाऊदने आपल्या पैशांच्या शक्तीचा वापर करुन बॉलिवूड आणि क्रिकेटच्या दुनियेत आपले प्रस्थ निर्माण केले. पैशाचा वापर करुनच त्याने काही बडया राजकारण्यांना आपल्याकडे खेचून घेतले. यूएईमध्ये असताना दाऊद जितका प्रभावशाली होता. तितका तो आता राहिलेला नाही. यूएईमध्ये दाऊदचा सेलिब्रिटींमध्ये वावर असायचा. वयोमानानुसार दाऊदची तब्येत आता पूर्वीसारखी नसावी. शेवटापर्यंत तो पाकिस्तानातच राहिल असे कुमार यांना वाटते.