मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच आहे; फक्त तो त्याच देशात सारखी ठिकाणे बदलून वास्तव्य करीत आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला.
एका कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी सांगितले की, दाऊदसारखे अतिरेकी सतत ठिकाण बदलत असतात पण तो पाकिस्तानात आहे याबाबत शंका नाही.
दाऊदचे अलीकडेच एक छायाचित्र आले असून त्यात गुप्तचर संस्थांनी तो त्यांच्या कुटुंबासह कराचीत राहत असल्याचा दावा गुप्तचर संस्थांनी केला आहे. त्या छायाचित्राबाबत राजनाथ सिंह यांनी सांगितले की, त्या छायाचित्राच्या सत्यासत्यतेबाबत सांगता येणार नाही. कुठल्याही बातमीवर आपण प्रतिक्रिया देणार नाही.
दाऊदकडे तीन पासपोर्ट असल्याबाबत विचारले असता, असे लोक नेहमीच अनेक पासपोर्ट ठेवतात व आपण संसदेतही ते स्पष्ट केले आहे. ते शक्य आहे, त्यात नवीन काही नाही, असे त्यांनी सांगितले.
दाऊद हा १९९३ च्या बॉम्बस्फोटात सामील होता व त्यात २५७ लोक ठार तर हजारो लोक जखमी झाले होते, त्याने खंडण्याही उकळल्या असून दहशतवादी हल्ल्यांसाठी आर्थिक मदतही केली आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावलेली असूनही अजून तो सापडलेला नाही. २००३ मध्ये अमेरिकेने त्याला अल काईदा व लष्कर ए तोयबाशी संबंध असलेला अतिरेकी म्हणून घोषित केले आहे. तरीही पाकिस्तान दाऊदला आश्रय देत आहे. यावरून या देशाच्या दहशतवादविरोधातील मोहिमेचा पुरता फज्जा उडाला आहे, हे पाकिस्तानी सरकारच्या उदासीनतेवरून स्पष्ट होत असल्याचे टीकाकारांनी म्हटले आहे.

मुंबईत दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी दाऊदने पाकिस्तानी भूमीचा वापर केल्याचे याआधीच्या वेळोवेळी केलेल्या तपासातून स्पष्ट झाले आहे. याचे पुरावे भारतीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानला पुरविले आहेत. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाला डॉझिअर पाठवले आहेत. मात्र पाकिस्नान सरकारने त्याविषयी कोणतीही कार्यवाही अद्याप केलेली नाही. उलट दाऊद इब्राहिम आमच्या देशात नसल्याचेही पाकिस्तानकडून वारंवार सांगण्यात आले आहे. केंद्रात सत्तेवर आलेल्या सरकारांनीही दाऊदला भारतात आणण्याचे प्रयत्न केले. परंतु दहशतवादाविरोधातील कारवाईचा देखावा करणाऱ्या पाकिस्तानच्या सरकारने या प्रयत्नांना म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे दाऊदला भारताच्या ताब्यात कधी देणार याविषयीची चित्र धूसर झाले आहे.