भारताला हवा असलेला अतिरेकी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात आहे व अमेरिकेच्या मदतीने त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले.
१९९३ च्या बॉम्बस्फोटात आरोपी असलेला दाऊद इब्राहिम कुठे आहे, या प्रश्नावर ते म्हणाले की, आमच्या माहितीप्रमाणे दाऊद पाकिस्तानातच आहे व आपण गेल्या वर्षी अमेरिकेत गेलो असताना तेथील अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाशी चर्चा केली तसेच एफबीआयसाठी काम करणाऱ्या महाधिवक्त्यांशी चर्चा केली. दाऊदबाबत एकमेकांना असलेल्या माहितीची देवाणघेवाण  करण्याचे आम्ही ठरवले होते. भारताला हवे असलेले हे गुन्हेगार एक-एक करून भारतात आणले जातील, सर्व येतील फक्त वाट पाहा, अशी विनंती त्यांनी केली.
१९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे ती अजून प्रलंबित आहे. अमेरिकेच्या मते दाऊदचे अल काईदा या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत. अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे व त्या प्रकरणाचा संयुक्त राष्ट्रांकडे पाठपुरावाही केला आहे.
दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात सय्यद झैबुद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल, फसिह महमूद ऊर्फ फसिह महंमद अब्दुल करीम टुंडा व यासिन भटकळ यांना भारतात आणण्यात यश मिळाले आहे.
तर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून एका महिलेवर पाळत ठेवल्याच्या प्रकरणी आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगावर एका न्यायाधीशाची एक-दोन दिवसात नेमणूक केली जाईल असे त्यांनी सांगितले.