दाऊदी बोहरा समाजातील महिलांनी त्यांच्या समाजातील खतना ही अमानुष प्रथा बंद व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी महिलांनी एकत्र येत दाऊदी बोहरी समाजात महिलांच्या गुप्तांगाचे विद्रुपीकरण (एफजीएम) करण्याच्या प्रथेविरोधात मोहीम सुरू केली होती. त्यासाठी १९ नोव्हेंबर रोजीच्या बालशोषण संरक्षण दिनापासून ‘वी स्पीक आऊट’ ही ऑनलाईन मोहीमही सुरू करण्यात आली होती. भारतात महिलांच्या गुप्तांगाच्या विद्रुपीकरणाविरोधात (एफजीएम) कोणताही कायदा अस्तित्वात नाही. जगातील अनेक देशांप्रमाणे भारतात आजही काही मागास प्रथांचे अनुकरण केले जाते. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना आणि दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंना याबाबत किमान निर्देश दिले पाहिजेत. या निर्देशातंर्गत ‘खतना’ या प्रथेला भारतीय दंडसंहिता आणि पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा ठरवण्यात यावे, अशी मागणी दाऊदी बोहरी समाजाच्या महिलांनी पत्राद्वारे केली आहे. भारतीय दंडसंहितेमधील कलम ३१९ ते ३२६ या कलमांमध्ये दुखापत आणि गंभीर इजा पोहोचवणाऱ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा नमूद करण्यात आल्या आहेत. याशिवाय, FGM ला पॉस्को कायद्यात नमूद करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाची व्याख्या लागू पडते, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मियाँ-बीवी ना राजी, तर काय करतील काझी!

यापूर्वी दाऊदी बोहरा समाजातील महिलांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयासमोर हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्रालयाने या प्रथेवर बंदी आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, बराच काळ उलटून त्यासाठी कोणतीच ठोस पावले न उचलण्यात आल्याने दाऊदी बोहरा समाजातील महिलांकडून ही मोहीम सुरू करण्यात आली. जगभरातील दाऊदी बोहरा या मुस्लीम समाजात धार्मिकतेच्या नावाखाली सुरु असलेल्या खतना(सुंथा) प्रथेमुळे महिलांचे शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण होत असून ही प्रथा मुलींचे लैंगिक शोषण करणारी आहे. महिलांना यातना देणाऱ्या ही प्रथा संपुष्टात आणण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

खतना करण्याच्या अमानुष पद्धती
खतना करण्यासाठी तीन पद्धतीचा अवलंब केला जातो. पहिल्या पद्धतीत योनीलिंगावरील त्वचा कापली जाते. दुसऱ्या पद्धतीत योनीलिंग आणि त्याबाहेरील आवरणाचा काही भाग कापला जातो तर तिसऱ्या पद्धतीत योनीचा खुला भाग कमी करण्यासाठी स्त्रीयांचे बाह्य जननेद्रिंयांना टाके घातले जातात. अशा अमानुष पद्धतीने केल्या जाणाऱ्या या प्रथेचे परिणामही भयंकर असून खतना केल्यानंतर शारीरिक व मानसिक इजांना सामोरे जावे लागते.