मेक्सिकन ड्रग्ज संघटनांप्रमाणे पाकिस्तानमधील डी-कंपनीचेही एकापेक्षा जास्त उद्योग आहेत अशी माहिती अमेरिकी कायदा प्रतिनिधींना देण्यात आली आहे. डी-कंपनीने अनेक क्षेत्रांमध्ये शिरकाव केला असल्याचंही त्यांना सांगण्यात आलं आहे. जॉर्ज मॅसन युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर लुईस शेली यांनी ही माहिती दिली आहे. भारताने फरार घोषित केलेल्या दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीने अनेक देशांमध्ये पाय पसरले आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलं. डी-कंपनीने अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी अनेक देशात आपलं जाळं तयार केलं असून, एक मजबूत संघटना झाली आहे असं त्यांनी अमेरिकी कायदा प्रतिनिधींना सांगितलं.

शेली यांनी डी-कंपनीचं जाळं अनेक देशांमध्ये पसरलं असल्याचा दावा केला आहे. दहशतवाद आणि बेकायदेशीर आर्थिक मदतीवर संसदेच्या आर्थिक सेवा संबंधी समितीकडून आयोजित चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. ‘मेक्सिकोमधील अंमली पदार्थ संघनांप्रमाणे डी-कंपनीचं जाळं वेगवगळ्या देशांमध्ये पसरलं आहे. ते हत्यार, बनावट डीव्हीडींची तस्करी करतात आणि हवालाच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवण्याचं कामही करतात’.

भारत सोडून फरार झालेला दाऊद इब्राहिम डी-कंपनीचा प्रमुक आहे. मुंबईतील अनेक दहशतवादी घटनांमध्ये हात असणारा दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानात लपून बसला आहे. भारताने अनेकदा दाऊद पाकिस्तानात असल्याचा पुरावाही दिला आहे. मात्र पाकिस्तान दाऊद आपल्या भुमीवर आहे हे मान्य करायला तयार नाही.