पेशावर येथील लष्करी शाळेत घडलेल्या नृशंस हत्याकांडाने बुधवारी संपूर्ण पाकिस्तान शोकसागरात बुडाला. देशभर शोकाचे, संतापाचे आणि दहशतवादाविरोधात लढण्याच्या निर्धाराचे वातावरण होते. या हल्ल्याचा निषेध करणारे मोर्चे पाकिस्तानात जागोजागी आयोजित करण्यात आले होते. शरीफ सरकारने या घटनेच्या पाश्र्वभूमीवर तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
राजकीय पातळीवरही संपूर्ण दिवसभरात वेगवान घडामोडी घडल्या. तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे डगमगून न जाता उलटपक्षी दहशतवादविरोधातील लढाई आणखी तीव्र केली जाईल, असा निर्धार व्यक्त करत पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दहशतवादाच्या बिमोडासाठी आठवडाभरात राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्याचे जाहीर केले. पाकिस्तानातील सर्वच विरोधी पक्षांनी शरीफ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे जाहीर केले. तर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेल्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-तालिबान’ तालिबानी संघटनेचा म्होरक्या व हल्ल्याचा सूत्रधार मुल्ला फजलुल्ला याला वेसण घालून त्याच्या मुसक्या आवळून पाकिस्तानच्या स्वाधीन करण्याचा इशारा देण्यासाठी अफगाणिस्तानात दाखल झाले. त्यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांची भेट घेऊन त्यांच्याशी फजलुल्लाच्या प्रत्यार्पणासंदर्भात चर्चा केली.

आता फाशीच
तालिबान्यांनी पेशावर येथे आर्मी पब्लिक स्कूलमध्ये केलेल्या हल्ल्यात १३२ विद्यार्थी मारले गेल्यानंतर पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानात दहशतवादाच्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यावरील बंदी उठवली आहे. फाशीची शिक्षा पुन्हा सुरू केल्यास पाकिस्तानला त्या वेळी युरोपीय समुदायाबरोबरचा व्यापार करार न होण्याची भीती वाटत होती. किमान दीडशे देशांनी फाशीची शिक्षा रद्द केली असून तेथे कुणाला फाशी दिले जात नाही. पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेले ८ हजार कैदी असून जर सरकारने फाशीची शिक्षा पुन्हा चालू केली, तर काही आठवडय़ातच त्यांना फाशी दिले जाऊ शकते, असे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. २००८ मध्ये पाकिस्तानात नागरिकांना फाशी देण्यावर बंदी घालण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय दबावामुळे फाशीच्या शिक्षेवरील बंदी कायम ठेवली होती, अशी माहिती पंतप्रधान शरीफ यांनी दिली.