आसामचे माजी पोलीस महासंचालक शंकर बारुआ यांनी बुधवारी आपल्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. शारदा चीटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गेल्याच महिन्यात त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली होती.
बारआ यांनी स्वत:वर गोळी झाडल्याचे कळताच त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे गुवाहाटीचे ज्येष्ठ पोलीस अधीक्षक ए. पी. तिवारी यांनी सांगितले.
बारुआ यांना मृत घोषित करण्यात आले आहे, आम्ही तपास करीत आहोत, सध्या त्याबाबत आम्ही काहीही सांगू शकणार नाही, तपास पूर्ण झाल्यावर माहिती देणे शक्य होईल, असेही तिवारी यांनी सांगितले. बारुआ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.शारदा घोटाळ्यात नाहक गोवण्यात आले असल्याने बारुआ यांना नैराश्याने ग्रासले होते, असे कुटुंबीयांनी सांगितले. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने गेल्या आठवडय़ापासून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते आणि बुधवारी सकाळीच त्यांना घरी पाठविण्यात आले होते.
घरी परतल्यानंतर अध्र्या तासाने ते आपल्या घराच्या गच्चीवर गेले आणि त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले. दरम्यान, दिल्लीत सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, सीबीआयने बारुआ यांची चौकशी केली नाही अथवा त्यांना चौकशीसाठी पाचारणही केले नाही. लोकप्रिय आसामी गायक सदानंद गोगोई यांच्या समूहाशी बारुआ यांचे संबंध होते व त्यांनी त्या समूहाला संरक्षण दिले, असा आरोप केल्यानंतर बारूआंचे नाव घोटाळ्याशी जोडले.