डी बी रिअॅलिटी या प्रसिद्ध बांधकाम कंपनीचे मालक विनोद गोएंका यांच्या भावाचे आफ्रिकेतील मोझांबिका येथे अपहरण करण्यात आले आहे. आफ्रिकेतील टोळीने त्याचे अपहरण केले असून विनोद गोएंका यांनी याबाबत परराष्ट्र मंत्रालयाला माहिती दिली आहे.

विनोद गोएंका यांचे बंधू प्रमोद गोएंका (वय ५२) हे ज्वेलरी व्यवसायात असून मोझांबिका येथील एका गुजराती व्यावसायिकाची भेट घेण्यासाठी ते गेले होते. शनिवारपासून प्रमोद गोएंका यांच्याशी संपर्क होत नव्हता. मात्र अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कैदेतील प्रमोद गोएंका यांचे छायाचित्र गोएंका कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले आणि हा प्रकार समोर आला. ‘मी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे’, अशी माहिती विनोद गोएंका ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली. अपहरणकर्त्यांनी अजून खंडणी मागितलेली नाही, असे त्यांनी सांगितले. प्रमोद हे कोठारी नामक व्यावसायिकाची भेट घेण्यासाठी गेले होते. ते दोघे एका हिरेव्यापाऱ्याला भेटणार होते. आता प्रमोद गोएंकांसह कोठारी देखील बेपत्ता झाल्याने त्याचेही अपहरण झाल्याची शक्यता आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली आहे. प्रमोद यांचा कॉल रेकॉर्ड तपासून लोकेशनचा शोध घेतला जाणार आहे. याशिवाय मोझांबिका सरकारशीही संपर्क साधण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

२०११ पासून मोझांबिका येथे जवळपास ९५ जणांचे अपहरण करण्यात आले असून खंडणीसाठीच हे अपहरण केले जाते. पैसे दिल्यावर संबंधितांची लगेचच सुटका केली जाते, असे या क्षेत्रातील सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे.

कोण आहेत प्रमोद गोएंका?
प्रमोद गोएंका हे विनोद गोएंका यांचे कनिष्ठ बंधू आहेत. जुहूत राहणाऱ्या प्रमोद गोएंका यांनी वर्षभरापूर्वी बांधकाम क्षेत्रातून बाहेर पडत हिरे व्यापार करण्याचा निर्णय घेतला. प्रमोद गोएंका घटस्फोटीत असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव यश तर मुलीचे नाव अवंतिका आहे. शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांचे मुलाशी बोलणे झाले होते. यानंतर त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यांचा मुलगा यशने जुहू पोलिसांकडे मिसिंगची तक्रारही दाखल केली होती.