देशात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिननंतर रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला मान्यता देण्यात आली आहे. आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये स्पुटनिक व्ही लशीच्या निर्मितीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने हिरवा कंदील दाखवला आहे. या परवानगीनंतर सिरम इन्स्टिट्यूट भारतात स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करणार आहे. डीसीजीआयनं स्पुटनिक व्ही लसीचं परीक्षण, चाचणी करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्डनंतर स्पुटनिक व्ही लस निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. या मंजुरीनंतर स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करणारी सिरम इन्स्टिट्यूट सहावी कंपनी आहे. पुण्यातील हडपसर केंद्रात स्पुटनिक व्ही लस निर्मितीसाठी मॉस्कोच्या गमलेया सिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ अपिडेमियॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीसोबत करार केला आहे.

भारतात सध्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजद्वारे स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन केलं जात आहे. स्पुटनिक व्ही लसीला आतापर्यंत ५०हून अधिक देशात मान्यता आहे. भारतात स्पुटनिक व्ही लसीचा एक डोस ९४८ रुपयांना उपलब्ध असणार आहे. त्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याने एकूण किंमत ९९५ रुपये ४० पैसे इतकी असेल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही रशियन बनावटीची लस भारतात सरासरी हजार रुपयांना उपलब्ध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

रशियामधून स्पुटनिक व्ही लसीचा पहिला साठा हा १ मे रोजी भरतात दाखल झाला होता. स्थानिक औषध प्रशासनाने त्याला १३ मे रोजी मान्यता दिली होती. आता भारतीय कंपन्यांच्या माध्यमातूनही या लसींची निर्मिती केली जाणार आहे. अनेक संशोधनांमध्ये ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे.