दूरदर्शनचे किसान टीव्ही चॅनेल (वाहिनी) जानेवारीच्या मध्यावधीत कार्यक्रम प्रक्षेपित करण्यास सुरू करील, असे सांगण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारीच्या मध्यावधीपर्यंत दूरदर्शनची २४ तास किसान वाहिनी सुरू करण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून विविध पदांवर व्यावसायिकांना स्थान दिले जात आहे. ही वाहिनी डिसेंबरअखेपर्यंत तयार होणे अपेक्षित होते पण पूर्वतयारी न झाल्याने तो उद्देश तडीस जाऊ शकला नाही. या वाहिनीसाठी १०० कोटी रुपये खर्च येणार आहे.
खंडपीठांची माहिती न देणे योग्यच
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्लीबाहेरच्या खंडपीठांबाबत माहिती दिल्यास त्यातून विनाकारण प्रादेशिक भावनांचा उद्रेक होईल व राजकीय वाद होतील तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठांबाबतची माहिती देऊ नये असे केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले आहे.मदुराई येथील राजील रूफस यांनी सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठांच्या स्थापनेबाबत झालेल्या बैठकांच्या नोंदीची माहिती द्यावी अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ती माहिती उघड करण्यास नकार दिला होता.
महिलेवर सामूहिक बलात्कार
नवी दिल्ली : आसाममधील एका तीस वर्षे वयाच्या महिलेवर पश्चिम दिल्लीतील मुंडका भागात तिच्या चार शेजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला. चारही आरोपींना अटक करून तिहार तुरुंगात टाकण्यात आले आहे. ही महिला तिचा पती मरण पावल्याने एकटीच राहत होती व तक्रारीनुसार हे चौघे तिला छळत होते. ८ नोव्हेंबरला त्यांनी तिला मारले व बलात्कार केला. नंतर कुणीतरी ही घटना फोनवर पोलिसांना कळवली तेव्हा पोलिसांनी आरोपींना पकडले. महिलेला संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महिलेचा चाकू हल्ला
बीजिंग : एका महिलेने केलेल्या चाकू हल्ल्यात दक्षिण चीनमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला. चाळीस वर्षे वयाच्या महिलेने स्वयंपाकघरातील चाकू  व खंजीर घेऊन बीजिंग शहरातील ग्वांगधी येथे दोन मुलांवर हल्ला केला त्यात तीन वर्षांचा मुलगा मरण पावला एक नऊ वर्षांची मुलगी जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल केले आहे. या महिलेचे त्यांच्याशी काही नाते होते किंवा नाही हे समजू शकले नाही.
मेहबूब बेग यांचा राजीनामा
लंडन : श्रीनगर- काश्मीरमधील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मेहबूब बेग यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते लोकसभेचे माजी खासदार असून त्यांनी आता मुफ्ती महंमद सईद यांच्या पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. बेग हे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मिर्झा अफजल बेग यांचे पुत्र असून त्यांनी अनंतनाग येथील सरनाल येथे त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसमवेत राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला.
कुडनकुल ऊर्जा प्रकल्प २२ जानेवारीला सुरू
नवी दिल्ली : कुडनकुलम या अणुऊर्जा प्रकल्पात २२ जानेवारी २०१५ पासून व्यावसायिक पातळीवर अणुऊर्जा उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. या ऊर्जा प्रकल्पाची क्षमता १००० मेगावॉट आहे. कुडनकुलम येथे सध्या १००० मेगावॉटच्या दोन अणुभट्टय़ा रशियाच्या सहकार्याने होत असून त्यातील पहिली अणुभट्टी २२ ऑक्टोबरला सुरू होणार होती. तांत्रिक कारणाने ती सुरू होऊ शकली नाही पण आता ती सुरू होणार आहे, असे अणुऊर्जा महामंडळाने म्हटले आहे.