महात्मा गांधी यांचे ‘पंचायत राज’चे स्वप्न साकारल्याचा दावा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये मुक्त आणि पारदर्शक वातावरणात अलीकडेच झालेल्या जिल्हा विकास परिषदांच्या (डीडीसी) निवडणुका आणि त्यामधील मतदारांचा सहभाग हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे सांगितले. आपल्याला लोकशाहीचे धडे शिकवणाऱ्यांवरही या वेळी मोदी यांनी निशाणा साधला.

भारतात लोकशाही नसल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती त्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर अवघ्या एका वर्षांतच आपल्या सरकारने त्रिस्तरीय पंचायत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही पुडुचेरीतील काँग्रेस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये त्रिस्तरीय पंचायत आकाराला आली असून ही प्रक्रिया म्हणजे राष्ट्रपिता म. गांधीजींचे ग्राम स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. दिल्लीतील काही लोक आपल्याला अहोरात्र शिव्यशाप देत असतात, ते आपल्याला नेहमी लोकशाहीचे धडे देत असतात, आपल्याला आता त्यांना आरसा दाखविण्याची इच्छा आहे, असेही मोदी म्हणाले. पुडुचेरीमध्ये स्थानिक निवडणुका न घेणाऱ्या काँग्रेसवर त्यांनी टीका केली.

जो पक्ष आपल्याला लोकशाही शिकवितो तो पक्ष पुडुचेरीमध्ये सत्तेत आहे, असे मोदी यांनी काँग्रेसचा उल्लेख न करताच सांगितले. काही पक्षांची शिकवण आणि प्रत्यक्ष कृती यांच्यात मोठी दरी आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. पुडुचेरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २००६ मध्ये झाल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही सरकार निवडणुकांना विलंब करीत आहे, असेही मोदी म्हणाले.

सर्वासाठी आरोग्य विमा

जम्मू-काश्मीरमधील सर्व नागरिकांना आरोग्य विम्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या आयुष्मान भारत योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले.

जम्मू-काश्मीरमधील सर्व नागरिक आणि समाजांना परवडणारी अत्यावश्यक आरोग्यसेवा, आर्थिक संरक्षण आणि सर्व प्रकारच्या आरोग्यविमा सुविधा मिळतील याची योजनेद्वारे खातरजमा केली जाणार आहे, असे पंतप्रधानांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचीही भाषणे झाली.

या योजनेद्वारे सर्व नागरिकांना विनामूल्य विमा सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे त्याचप्रमाणे प्रतिकुटुंब पाच लाख रुपयांची आर्थिक सुविधाही दिली जाणार आहे.