दिल्ली क्रिकेट संघटनेतील गैरप्रकारांप्रकरणी ‘आप’च्या नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर केलेल्या आरोपांचे पडसाद सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करीत व्हेलमध्ये जमून घोषणाबाजी केली. तर लोकसभेमध्ये शून्यकाळात पी. वेणूगोपाल यांनी या हा मुद्दा उपस्थित केला. दोन्ही सभागृहात अरूण जेटली यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत चर्चेची संपूर्ण तयारी दर्शविली. या प्रकरणाची संसदेच्या संयुक्त समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी वेणूगोपाल यांनी केली आहे.
लोकसभेमध्ये वेणूगोपाल यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना जेटली म्हणाले, दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी ९०० कोटींचा खर्च आला. त्या स्टेडियमची आसनक्षमता केवळ १४ हजार इतकीच आहे. त्याबद्दल कोणी आवाज काढत नाही. पण कोटला स्टेडियमच्या कामांसाठी ११४ कोटी रुपयांचा खर्च आला. त्याबद्दल विनाकारण आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्लीला क्रिकेटसाठी चांगले स्टेडियम असावे, या हेतूने आम्ही हे स्टेडियम उभारले. बांधकामासाठी पैशांच्या उभारणीसाठी त्यातील काही बॉक्स हे दहा वर्षांसाठी विकण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या स्टेडियमचे बांधकाम सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीकडून करण्यात आल्याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.