उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात मृत वटवाघळं सापडल्याने स्थानिकांमध्ये खळबळ माजली आहे. गोरखपूरमधील बेलघाट परिसरात ही मृत वटवाघळं सापडली आहे. देशात करोनाने थैमान घातला असताना वटवाघळं मृत सापडल्याने स्थानिकांनी भीती व्यक्त केली आहे. स्थानिक करोनाशी संबंध जोडत असताना वनअधिकारी मात्र उष्णतेमुळे वटवाघूळांचा मृत्यू झाल्याचं सांगत आहेत.

दरम्यान मृत्यूचं नेमकं कारण माहिती करुन घेण्यासाठी वटवाघळं मृतदेह बरेली येथील पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत पाठवण्यात आले आहेत. एका स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, “सकाळी माझ्या शेतात आंब्याच्या झाडाखाली मृत वटवाघळं पडली असल्याचं मला दिसलं. फक्त माझ्याच नाही तर बाजूच्या शेतातही मोठ्या संख्येने ही वटवाघळं मृत पडली होती”.

“यानंतर आम्ही तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली. त्यांनी येऊन मृत वटवाघळं नेलं. तसंच उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करत त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवा,” अशी सूचना केली अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच वनअधिकारी देवेंद्र कुमार घटनास्थळी पोहोचले होते. “प्राथमिकदृष्ट्या उष्णता आणि पाणी न मिळाल्यानेच वटवाघळं मृत्यू झाला असावा असं दिसत आहे. परिसरातील तळ्यातदेखील पाणी नसून पातळी खालावली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. पशुवैद्यकीय संशोधन संस्थेकडून रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल असं त्यांनी सांगितलं आहे.