ओडिशामध्ये पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेच्या मृत्यूनंतर तिला खांदा देण्यासाठी गावातील चार लोकही पुढे आले नाहीत. अखेर महिलेच्या नातेवाईकाने मृतदेह सायकलवर बांधून स्मशानभूमीपर्यंत नेला आणि अंत्यसंस्कार केले. ही घटना बौद्ध जिल्ह्यातील ब्राम्हणी पाली पंचायतमधील कृष्ण पाली गावातील आहे.

या घटनेनंतर अनेकांना महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील लोक का आले नाहीत असा प्रश्न पडला आहे. मृत महिलेचा भावोजी यामागचा मुख्य कारण आहे. चतुर्भज बांक असं त्यांचं नाव आहे. पहिल्या पत्नीपासून मूल न झाल्याने त्यांनी दुसऱ्या जातीतील महिलेशी लग्न केलं होतं. ते मजुरी करायचे. त्यांच्यावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. त्यांच्यासोबत कोणत्याही कार्यक्रमात ते हजर राहत नव्हते.

यादरम्यान चतुर्भज यांच्या पत्नीची छोटी बहिण त्यांच्याकडे येऊन राहू लागली होती. दोन दिवसांपुर्वी डायरिया झाल्याने दोघींची तब्बेत बिघडली होती. दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी चतुर्भज यांच्या मेहुणीचा मृत्यू झाला. मृतदेह घरी आणल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांची मदत मागितली. मात्र कोणीही त्यांना मदत करण्यास नकार दिला. अखेर त्यांनी मृतदेह सायकलला बांधला आणि स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्कार केले.