देशात एकीकडे करोना संकट नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असताना गंगेच्या किनारी मृतदेहांचा खच सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे या मृतदेहांवरुन निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरु असताना एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पीपीई किट घातलेली एक व्यक्ती करोना रुग्णाचा मृतदेह ब्रीजवरुन नदीत फेकत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात ही घटना घटना घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

रापती नदीमध्ये हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली असून पीडित व्यक्तीची ओळख पटवली आहे. प्रेमनाथ असं या पीडित व्यक्तीचं नाव असून ते शोहरतगढ येथील सिद्दार्थनगरचे रहिवासी होते.

बलरामपूरच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “करोनाची लागण झाल्यानंतर प्रेमनाथ यांना २५ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान २८ मे रोजी त्यांचं निधन झालं. प्रोटोकॉलचं पालन करत प्रेमनाथ यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला. पण त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह नदीत टाकून दिला”.

पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात नदीत मृतदेह सापडले असल्याने संताप व्यक्त होत असतानाच ही घटना समोर आली आहे.