करोनामुळं मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या पार्थिवावर त्याच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले मात्र, आठवडाभरानं तो पुन्हा घरी परतल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. करोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाबाबत अनेक गोंधळाच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात पश्चिम बंगालमधील या नव्या घटनेची भर पडली आहे. टाइम्सनाउ न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिदबास बॅनर्जी (वय ७५) यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ४ नोव्हेंबर रोजी बलरामपूर बासू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी रुग्णालयाने त्यांच्या नातेवाईकांना तुमच्या रुग्णाचा करोनाच्या संसर्गानं मृत्यू झाल्याचं कळवलं आणि त्यांचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला. त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र, आठवड्याभरानंतर शिदबास यांच्या उत्तरपुजेचा कार्यक्रम घरी आयोजित केलेला असताना अचानक त्यांना रुग्णालयातून फोन आला आणि तुमचा रुग्ण जिवंत असून तो करोनामुक्त झाला असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांच्याकडे जो मृतदेह सोपवण्यात आला होता तो दुसऱ्या रुग्णाचा असल्याची माहितीही रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यानंतर कुटुंबीय तातडीने रुग्णालयात गेले आणि शिदबास यांना घरी घेऊन आले.

आणखी वाचा- “परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे”; महाराष्ट्रासह चार राज्यांकडून सर्वोच्च न्यायालयानं मागवला अहवाल

माहितीच्या आदलाबदलीमुळे झाला गोंधळ

अधिकाऱ्यांनी सांगितलं की बॅनर्जी यांचा मृतदेह समजून मोहिनीमोहन मुखर्जी यांचा (वय ७५) मृतदेह बॅनर्जी यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला होता. या दोन्ही रुग्णांच्या माहितीची आदलाबदल झाल्याने हा गोंधळ झाला. हे दोन्ही रुग्ण एकाच दिवशी रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, त्यानंतर मुखर्जी यांना बरासत येथील कोविड केंद्रात हालवण्यात आलं होतं. पण रुग्णालयाने चुकून बॅनर्जी यांचा वैद्यकीय अहवाल बरासत येथील केंद्राकडे पाठवला. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

आणखी वाचा- देशात पुन्हा लॉकडाउन? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली बैठक

कोविड-१९च्या प्रोटोकॉलमुळे चेहराही नाही आला पाहता

मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर ओळखीची आदलाबदल झाल्याने रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने त्यांचा मृतदेह कोविड-१९च्या प्रोटोकॉलनुसार पूर्णपणे सुरक्षा कपड्यात झाकून बॅनर्जी यांच्या कुटुंबियांकडे सोपवला. त्यामुळे मृतदेहाचा चेहराही पाहू न शकल्याने आपण अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती ही आपली व्यक्ती नव्हतीच हे त्यांना कळू शकलं नाही.