पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष  शिगेला पोहचला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राणाघटमधील भाजपा खासदार जगन्नाथ सरकार यांच्या वाहनास  ट्रकने धडक दिल्यानंतर, हा माझ्या हत्येचा प्रयत्न असल्याचं सांगत, याबद्दल टीएमसीवर आरोप करण्यात आला आहे. सध्यातरी पोलिसांनी या प्रकरणी अधिक काहीच माहिती दिलेली नाही.

ही घटना काल(रविवार) रात्री २४ परगना जिल्ह्यात घडली. जगन्नाथ सरकार हे दिल्लीहून  बंगालला येत होते. या दरम्यान बारासात भागात एका अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनास  धडक दिली. मात्र जगन्नाथ सरकार यांचा वाहन चालक व सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे  मोठा अनर्थ टळला.

घटना घडली तेव्हा वाहतुकीच्या कोंडीमुळे जगन्नाथ सरकार यांचे वाहन एका कडेला उभे होते व त्यांचे सुरक्षा रक्षक वाहतुकीची कोंड सोडवण्यासाठी खाली उतरले होते. याचेवळी एका भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनास धडक दिली. या घटनेनंतर जगन्नाथ सरकार यांनी म्हटले आहे की, वाहनचालकाने ऐनवेळी वाहन विरुद्ध दिशेला वळवल्याने अनर्थ टळला. त्या ट्रक चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना व कागदपत्रं देखील नव्हते. चौकशीत त्याने आपण मुर्शिदाबादचे असल्याचे सांगितले. तसेच, सरकार यांनी आरोप केला आहे की हा माझ्यावरील जीवघेणा हल्ला होता. हा हल्ला टीएमसीच्या इशाऱ्यावर करण्यात आला आहे.