चीनमध्ये माथेफिरूंकडून निरपराध्यांवर चाकूहल्ले करण्याच्या घटना सुरूच आहे. मंगळवारी शाळकरी मुलांवर केलेल्या चाकूहल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच बुधवारी पुन्हा एकदा एका माथेफिरूने केलेल्या चाकूहल्ल्यात सात नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. शेजारच्यांशी झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
चीनच्या मध्य हेनन प्रांतातील पिंगडिंगशन शहरालगतच्या गावात बुधवारी पहाटे हे हल्लाप्रकरण घडले. शेजारच्याशी झालेल्या वादातून एका माथेफिरूने शेजारच्यांवर केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी तातडीने हल्लेखोराला अटक केल्याची माहिती क्झिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे.
मंगळवारीदेखील एका माथेफिरूने एका प्राथमिक शाळेत घुसून शाळकरी मुलांवर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात आठ मुले जखमी झाली होती. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
कम्युनिस्टांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये गेल्या काही काळात निरपराध नागरिकांवर चाकूने हल्ला करण्याच्या प्रकारांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय इतर हिंसक घटनांमध्ये उत्तरोत्तर वाढ होऊ लागल्यामुळे चीन सरकारने आक्रमक धोरण स्वीकारत सर्व शहरांमध्ये जागोजागी सशस्त्र पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.