News Flash

अमेरिकेतील सर्वच राज्ये गोठली

गेल्या काही दिवसांपासून ध्रुवीय वाऱ्यांनी आणलेल्या थंडीने (पोलर व्हर्टेक्स) सध्या अमेरिकेत हाहाकार उडाला आहे.

| January 9, 2014 12:56 pm

गेल्या काही दिवसांपासून ध्रुवीय वाऱ्यांनी आणलेल्या थंडीने (पोलर व्हर्टेक्स) सध्या अमेरिकेत हाहाकार उडाला आहे. या हाडे गोठवणाऱ्या ध्रुवीय वाऱ्यांमुळे अमेरिकेतील तापमान कमालीचे घसरले असून, बुधवारी सर्वच्या सर्व ५० राज्ये अक्षरश: गोठून गेली. या शीतप्रकोपामुळे १९ कोटी नागरिकांना फटका बसला असून, रविवारपासून जीवघेण्या गारठय़ामुळे २१ नागरिकांचा बळी गेला आहे. बर्फाच्या कणांचा धुरळा उडवणाऱ्या ध्रुवीय वाऱ्यांमुळे जनजीवन कमालीचे विस्कटले असून, तर पुढील २४ ते ४८ तासांत तापमान आणखी घसरून परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अमेरिका खंडातील तापमान दिवसेंदिवस घटत चालले असून न्यूयॉर्क शहरातील सेंटर पार्कमधील तापमानाने गेल्या ११८ वर्षांतील विक्रम मोडला आहे. येथील तापमान उणे १५ अंश सेल्सियस इतके घसरले होते. हवाई भागात उणे सात, हेल, मिशिगनमधील तापमान उणे २६ तर मिनेसोटा भागात उणे ३७ अंश सेल्सियस इतके नोंदले गेले आहे.
अतिशय कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. तर केंटुकी प्रांतातील तुरुंगातून फरारी झालेल्या रॉबर्ट विक नावाच्या कैद्याने तर थंडीला घाबरून पुन्हा स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. शिकागो येथील प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचीही अवस्था बिकट झाली आहे.
थंडीच्या लाटेचा फटका रस्तेवाहतुकीसह रेल्वे आणि हवाई वाहतुकीलाही मोठय़ा प्रमाणात बसला आहे. हवाई वाहतूक प्रशासनाने सुमारे २७०० विमाने रद्द केली असून, गेल्या चार दिवसांमध्ये तब्बल ११ हजार विमाने रद्द करण्यात आली. याशिवाय या थंडीमुळे रेल्वेसेवाही विस्कळीत झाली असून शिकागोला जाणाऱ्या तीन रेल्वेमधील सुमारे ५०० प्रवासी रात्रभर अडकून पडले.
दरम्यान, एरिक होल्थॉस या हवामानतज्ज्ञाच्या उणे २१ अंश तापमानाला कडक तापवलेल्या पाण्याचा काही क्षणात कसा बर्फ होतो, हे दाखवणाऱ्या चित्रफितीमुळे खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 12:56 pm

Web Title: deadly cold snap in us shatters temp records sends even polar bears to shelter
Next Stories
1 कोळसा खाणवाटपातील अनियमिततेला केंद्र जबाबदार
2 अमेरिकेत धूम्रपानविरोधी धोरण यशस्वी
3 जनता थंडीने त्रस्त, नेत्यांचा मात्र परदेशात ‘अभ्यास’
Just Now!
X