२४७ जणांना वाचवण्यात यश, मदत कार्य वेगात
जपानमध्ये अलिकडेच झालेल्या भूकंपानंतर दक्षिण तैवानमध्ये मोठा भूकंप झाला असून त्यात आतापर्यंत ११ जण ठार झाले आहेत शिवाय अनेक लोकांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे. तेथे एक सोळा मजली इमारत कोसळली. हा भूकंप शक्तिशाली होता व त्यात वाचलेल्यांचा शोध चालू आहे, अनेक लोक बेपत्ता आहेत. तीस जण ढिगाऱ्याखाली अडकले असून किमान १०० घरे कोसळली आहेत.
मदत पथकाने २४७ जणांना तैनान शहरात ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहे, या शहरात भूकंपाने मोठा फटका बसला असून बाराशेहून अधिक शिडय़ा मदतकार्यात वापरण्यात आल्या आहे. या इमारतीत नवजात बालकांचे शुश्रूषा केंद्र होते, त्यामुळे अनेक माता व नवजात बालके ढिगाऱ्याखाली गेली आहेत. नवीन चांद्र वर्षांचा जल्लोष सुरू होण्याच्या दोन दिवस आधी ही घटना घडली आहे. तेथील लोकांना नववर्षांच्या सुटय़ा लागलेल्या आहेत. अनेक लोक झोपेत असताना शुक्रवारी पहाटे चार वाजता हा भूकंप
झाला. त्याचे केंद्र युजिंगच्या आग्नेयेला ३५ कि.मी. अंतरावर होते व त्याची खोली १० कि.मी. होती, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र संस्थेने सांगितले आहे.