मुलीचं आणि वडिलांचं नातं कसं असतं? एका शब्दात मांडता येणं खरंच शक्य नाही. मात्र त्यांच्यातलं नातं, प्रेम आपुलकी हा एक अनोखा बंध असतो. दमलेल्या बाबाची कहाणी आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. आता समोर आला आहे बाबा आणि मुलीच्या नात्यासंदर्भातला एक सुंदर व्हिडीओ. जो पाहून आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एक कर्णबधीर बाबा त्याच्या नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या बाळाशी संवाद साधू पाहतो आहे. त्यासाठी तो खाणाखुणांची सांकेतिक भाषा वापरतो आहे. तिला सांगतो आहे, बाळा मी तुझा मी बाबा आहे.

अमेरिकेती बास्केटबॉलपटू रेक्स चॅम्पमनने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत कर्णबधीर बाबा त्याच्या तान्ह्या मुलीशी खाणाखुणा करुन संवाद साधताना दिसतो आहे. ४१ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये ही मुलगी तिच्या बाबाकडे पाहते आहे. तिला त्या खाणाखुणा कळतही नाहीत. पण ती लक्षपूर्वक बाबा काय करतो आहे ते पाहते आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिकेतल्या या बाबाने तिच्या मुलीला आपल्या हातात काळजीपूर्वक धरलं आहे. तो तिच्याशी सांकेतिक भाषेतून संवाद साधतो आहे. या खाणाखुणा काय आहेत? हे त्या मुलीला समजलेलं नाही मात्र ती एकटक बाबाकडे पाहते आहे. जणू काही ती त्याला समजून घेते आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ हजारोवेळा रिट्विट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला नेटकऱ्यानी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. रेक्स चॅम्पमन यांनी जेव्हा हा व्हिडीओ शेअर केला तेव्हा त्याने या व्हिडीओतला बाबा कर्णबधीर आहे आणि तो मुलीशी संवाद साधू पाहतो आहे हे लिहिलं. त्यानंतर काही नेटकऱ्यांनी या सांकेतिक भाषेला शब्दरुप देण्याचा प्रयत्न केला. ते असं आहे ” बाबा, मी तुझा बाबा आहे. आय लव्ह यू. तू खूप सुंदर मुलगी आहेस, तुझे डोळे खूप सुंदर आहे. तुझं हास्यही किती सुंदर आहे. मी तुला या उबदार पांघरुणात गुंडाळलं आहे. तू किती गोड मुलगी आहेस, आय लव्ह यू, आय लव्ह यू!”

या नेटकऱ्या प्रमाणेच अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ रिट्विट करत त्यांचे अनुभव लिहिले आहेत. त्यांच्या शब्दात या व्हिडीओला शब्दरुप देण्याचा प्रयत्न केला आहे.