News Flash

Coronavirus : नोव्हेंबरमध्ये करोनाबळींच्या संख्येत घट

मुंबईत बुधवारी ७२४ नवे रुग्ण आढळले तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला.

| December 2, 2020 01:56 am

नवी दिल्ली : देशात नोव्हेंबर महिन्यात करोनाचा संसर्ग आणि मृत्यू होण्याच्या प्रमाणात ३० टक्क्यांनी घट झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. सध्या देशातील करोनाबाधितांची संख्या ९४.६२ लाखांवर पोहोचली असून एकूण ८८ लाख ८९ हजार ५८५ जण बरे झाले आहेत, असे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशात गेल्या २४ तासांत ३१ हजार ११८ जणांना करोनाची लागण झाली असून करोनाबाधितांची एकूण संख्या ९४ लाख ६२ हजार ८०९ वर पोहोचली आहे. तर करोनामुळे आणखी ४८२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक लाख ३७ हजार ६२१ इतकी झाली आहे.

मुंबईत ७२४ नवे रुग्ण

मुंबईत बुधवारी ७२४ नवे रुग्ण आढळले तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या सहा महिन्यातील एका दिवसातील मृतांची ही सर्वात कमी संख्या आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा एकदा आटोक्यात येऊ लागली आहे. रुग्ण वाढीचा दर किंचित कमी म्हणजे ०.३३ टक्के  झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून २१३ दिवसांवर आला आहे. बुधवारी एकूण बाधितांची संख्या २ लाख ८४ हजारापुढे गेली आहे. तर एका दिवसात १२८० रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २ लाख ५७ हजाराहून अधिक म्हणजेच ९१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १२,४४० रुग्ण उपचाराधीन आहेत.  १ जुलै रोजी ६ मृत्यू झाले होते तर त्यापूर्वी २३ एप्रिलला ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मृत्युदर ४ टक्के झाला असून मृतांची एकूण संख्या १०,८१९ झाली आहे.   मुंबईत दररोज १० हजाराहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण अद्याप १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

ठाणे जिल्ह्य़ात ७ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्य़ात मंगळवारी ४८१ नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या २ लाख २९ हजार ५०० इतकी झाली आहे. तर, दिवसभरात ७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्य़ातील एकूण मृतांची संख्या ५ हजार ६९२ इतकी झाली आहे. मंगळवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरात सर्वाधिक म्हणजे  १२० रुग्णांची नोंद झाली.

राज्यात करोनातून मुक्त होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्यांवर

राज्यात आतापर्यंत १६ लाख ९१ हजार ४१२ रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्यांवर पोहोचले आहे. राज्यात दिवसभरात ९५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या पाच लाख ३८ हजार व्यक्ती गृह अलगीकरणात असून सहा हजार ४२० संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर विविध रुग्णांलयांमध्ये ७९ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासात नाशिक १६९, पुणे महापालिकेत २८७ नव्या करोना बाधितांची नोंद झाली. तर रत्नागिरी जिल्ह्य़ात एकही नवीन रुग्ण सापडला नाही.

’ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून करोनाबाधितांच्या संख्येत घट होऊ लागली आहे.

’ नोव्हेंबर महिन्यात एकूण १२ लाख ७८ हजार ७२७ जणांना करोनाची लागण झाली, ऑक्टोबर महिन्यात ही संख्या १८ लाख ७१ हजार ४९८ इतकी होती.

’ देशातील बरे होण्याचे प्रमाण ९३.९४ टक्के इतके झाले आहे.

’ करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १.४५ टक्के इतके आहे.

’ देशात सध्या चार लाख ३५ हजार ६०३ उपचाराधीन रुग्ण असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या ४.६० टक्के इतके आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2020 1:56 am

Web Title: death due to coronavirus decline in the month of november zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चीनचे यान यशस्वीरित्या चंद्रावर!
2 मुंबई हल्ला : तीन मच्छीमारांच्या कुटुंबीयांना १२ वर्षांनी भरपाई
3 पाकिस्तानच्या गोळीबारात ‘बीएसएफ’ उपनिरीक्षक शहीद
Just Now!
X