दिल्लीमध्ये ३७ वर्षीय करोनाबाधित पत्रकाराच्या मृत्यूवरुन सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तरुण सिसोदिया असं या ३७ वर्षीय पत्रकाराचं नाव आहे. करोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी त्यांनी रुग्णालयाच्या चौथ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. यानंतर त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचा मृत्यू झाला. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

तरुण सिसोदिया एका हिंदी वृत्तपत्रासाठी काम करत होते. दिल्लीमधील भजनपुरा येथे ते वास्तव्यास होते. तरुण सिसोदिया यांनी रुग्णालयात दाखल असताना तेथील उपचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला होता. त्यांनी आऱोग्य मंत्रालयाकडेही यासंबंधी तक्रार केली होती. ज्यानंतर आरोग्य मंत्रालयाने रुग्णालयाला सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितलं.

रुग्णालयाने तरुण सिसोदिया यांच्याकडून फोन काढून घेतला होता असा आरोप आहे. तक्रार करण्यापासून रोखण्यासाठी तसंच उपचारासातील हलगर्जीपणावर वारंवार बोट ठेवण्यापासून रोखण्यासाठी रुग्णालयाने त्यांना आयसीयूत शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला होता असं सांगितलं जात आहे. रुग्णालयाने आपल्या स्टेंटमेंटमध्ये त्यांच्या वागण्यात विसंगती असल्याने न्यूरोलॉजिस्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ यांच्याकडून तपासणी करुन औषधोपचार केले जात होते असं सांगितलं आहे.

यादरम्यान सोशल मीडियावर तरुण सिसोदिया यांचे एका व्हॉट्सअॅप ग्रुपवरील चॅट व्हायरल झालं आहे. यामध्ये तरुण सिसोदिया यांनी आपली हत्या होईल अशी भीती व्यक्त केली होती.

रुग्णालयाने सोमवारी माहिती देताना सांगितलं होतं की, दिलेल्या माहितीनुसार, “२४ जून रोजी तरुण सिसोदिया यांना करोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत होती. त्यांना आयसीमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याचा विचार करत आहोत. करोनावरील उपचार करताना विसंगती आढळत असल्याने न्यूरोलॉजिस्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ यांच्याकडून त्यांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात येत आहेत. कुटुंबाला त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली जात आहे”.

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, “सोमवारी संध्याकाळी तरुण आपल्या रुममधून धावत गेले. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ते चौथ्या माळ्यावर गेले आणि खिडकीतून उडी मारुन आत्महत्या केली”.

रवीश कुमार यांनी घटनेवर शोक व्यक्त केला असून फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी तरुण सिसोदिया यांना अडीच वर्षाचा मुलगा आणि दोन महिन्यांची मुलगी असल्याची माहिती दिली आहे.

आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून ४८ तासात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. तरुण सिसोदिया यांच्या मृत्यूवर त्यांनी शोक व्यक्त केला असून खूप धक्का बसला असल्याचंही म्हटलं आहे.