राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या कानपूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात सुरुक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकींच्या रस्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामुळे झालेल्या ट्रॅफिकमध्ये अडकून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना गोविंदपुरी पुलावर वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेची प्रकृती अधिकच बिकट झाली आणि जेव्हा रुग्णालयात पोहोचली तेव्हा खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.

भारतीय उद्योग संघटनेच्या स्थानिक महाविद्यालयाच्या महिला शाखेच्या अध्यक्ष वंदना मिश्रा (५०) शुक्रवारी गोविंदपुरी पुलावरील ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या भेटीमुळे येथे वाहतूक बंद करण्यात आली होती. ४५ मिनिटे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती अशी माहिती देण्यात आली आहे. ट्रॅफिक सुटल्यानंतर वंदना यांना रुग्णालयामध्ये पोहोचण्यासाठी सुमारे दीड तास लागला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गोविंदपुरी पुलावर तैनात असलेल्या पोलिसांना वारंवार विनंती करूनही रस्ता उघडला गेला नाही, असा आरोप परिवाराने केला आहे. त्यानंतर कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक आणि तीन हेड कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले आहे.

कानपूरचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) बी बी जी टी एस मूर्ती यांनी शनिवारी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, पोलीस उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

कानपूर पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलने मिश्रा यांच्या मृत्यूबद्दल दिलगिरी व्यक्त केली. “महामहिम राष्ट्रपती, बहीण वंदना मिश्रा यांच्या अकाली निधनामुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी पोलिस आयुक्तांना व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेतली आणि शोकग्रस्त कुटुंबापर्यंत आपला संदेश पोहचविण्यास सांगितले. दोन्ही अधिकारी अंत्यसंस्कारात हजर झाले आणि शोकसंतप्त कुटुंबाला राष्ट्रपतींचा संदेश दिला,”असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

नागरिकांना सुरक्षिततेसाठी कोणतीही अडचण येऊ नये, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मुळीच नाही. अशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार आणि ३ तीन हेड कॉन्स्टेबलना यांना सांगितलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ वाहतूक रोखल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त दक्षिण याचा अधिक तपास करतील,” असे आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

शुक्रवारी सायंकाळी मिश्रा यांना मळमळ आणि उलट्या झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात जाण्यासाठी त्या निघाल्या. मात्र नंदलाल चौक ते गोविंदपुरी उड्डाणपूल दरम्यान झालेल्या ट्रॅफिकमध्ये त्या अडकून पडल्या.

शनिवारी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना इंडियन इंडस्ट्रीज असोसिएशन कानपूरचे विभागीय अध्यक्ष आलोक अग्रवाल म्हणाले की, मिश्रा यांनी २ ते १४ एप्रिलपर्यंत कोविड १९ची लागण झाल्यानंतर कोविडनंतरच्या गुंतागुंतीमुळे झालेल्या समस्यांशी त्या झगडत होत्या.

“शुक्रवारी दुपारी त्यांनी रुग्णालयात जाऊन चाचण्या केल्या होत्या. संध्याकाळी ४ च्या सुमारास घरी परतल्यानंतर पुन्हा ६ च्या सुमारास मळमळ आणि अस्वस्थता वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर बरीच रहदारी असल्याने, त्यांना उशीर झाला आणि गाडीमध्ये असताना त्यांना उलट्या झाल्या. तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या कुटुंबातील डॉक्टर असणाऱ्या सदस्याने देखील त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला,” असे अग्रवाल यांनी सांगितले.

शुक्रवारी व्हीआयपी गाड्यांमुळे अनेक रस्ते अडवण्यात आले आणि ज्या रस्त्यावर मिश्रा यांचे वाहन अडकले होते त्यापैकी एक मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली होती. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री व राज्यपालही शहरात होते. राष्ट्रपती कोविंद हे तीन दिवसांच्या कानपूर दौर्‍यावर आहेत आणि रविवारी ते त्यांचे गाव परुंख येथे भेट देतील.