देशाता करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि बेड्स उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत देखील काही प्रसंग हे लोकांसाठी हुरूप निर्माण करण्याचं काम करत आहेत. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी ‘लव यू जिंदगी’ या गाण्यासोबत एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ पाहून लोकांमध्ये थोड्याफार प्रमाणात सकारात्मता निर्माण झाली होती. त्या महिलेचा आता मृत्यू झाला आहे. महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याची माहिती दिली आहे.

डॉ. मोनिका लांगेह यांनी रुग्णालयातील एका ३० वर्षीय महिलेचा व्हडिओ ट्विटरवर शेअर केला होता. व्हिडिओमधील महिला करोना पॉझिटिव्ह असताना देखील उत्साही दिसत होती. गुरुवारी रात्री डॉ. मोनिका यांनी त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती ट्विटरवर दिली.

“मी खूप दुःखी आहे, आपण खूप शूर मुलीला गमावले ओम शांति तिच्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी प्रार्थना करा” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. यानंतर अनेकांनी या ट्विटवर आपले दुःख व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा- देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ जणांना करोनाची लागण

डॉ. मोनिका यांनी ८ मे रोजी एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुण मुलीला आयसीयू बेड मिळाला नव्हता यामुळे ती कोव्हिड आपत्कालीन कक्षात गेल्या १० दिवसांपासून दाखल होती. तिला NIV सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त तिच्यावर रेमडेसिवीर आणि प्लाझा थेरपीद्वारे उपचार करण्यात येत होते असे या ट्विटमध्ये लिहिले होते. मात्र त्यानंतर तिला आयसीयू बेड मिळाला होता. १०.५ लाख लोकांनी ट्विटर हा व्हिडिओ पाहिला होता.

आणखी वाचा- “फक्त नरेंद्र मोदींमुळेच लशींचा तुटवडा, ते लोकांशी खोटं बोलताहेत”

या मुलीमध्ये दृढ इच्छाशक्ती आहे असे डॉक्टर मोनिका यांनी लिहिले होते. त्या महिलेने गाणी ऐकता येतील का असे डॉ. मोनिका यांना विचारले होते. डॉक्टरने शाहरुख आणि आलिया भट्ट यांच्या डियर जिंदगी चित्रपटातील ‘लव यू जिंदगी’ हे गाणं लावलं. व्हिडिओमध्ये त्या महिलेच्या नाकावर ऑक्सिजन मास्क लावला असताना ती आरामात त्या गाण्याच्या तालावर झुलत होती. हा व्हिडिओ शेअर करत डॉ. मोनिका यांनी ‘धडा: कधीही आशा गमावू नका’ असे लिहिले होते. दुर्दैवाने या महिलेचा मृ्त्यू झाला आहे. नेटकऱ्यांनी याविषयी आपलं दुःख व्यक्त या महिलेला श्रद्धांजली वाहिली आहे.