हैदराबाद : गेल्या महिन्यात तेलंगण  राज्यात महिला तहसीलदारास जाळून ठार मारल्याच्या घटनेवेळी तिला वाचवण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांपैकी एका जखमी कर्मचाऱ्याचा सोमवारी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या चार झाली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

महसूल कार्यालयातील कर्मचारी के. चंद्रय्या हा तहसीलदार महिलेस वाचवण्यासाठी गेला असता तोही भाजला होता. खासगी रुग्णालयात त्याचा सोमवारी मृत्यू झाला. तेलंगणमधील महसूल कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध करून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. तहसीलदार विद्या रेड्डी यांना त्यांच्या अब्दुल्लापूरपेट येथील कार्यालयात ४ नोव्हेंबर रोजी जमिनीच्या वादातून एका व्यक्तीने पेट्रोल ओतून जाळले होते. त्यात सदर महिला तहसीलदाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा गाडीचालक गुरुनाथम व चंद्रय्या हे तिला वाचवण्याच्या प्रयत्नात भाजले होते. हे दोघे व हल्लेखोर के. सुरेश यांना उपचारांसाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले होते.