स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात घेऊन जाणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांमध्ये होणारे मजुरांचे मृत्यू होण्याच्या घटना या वेगवेगळ्या व किरकोळ असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाचा दोषी धरता येणार नाही असं मत भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी व्यक्त केलं आहे. गुरुवारी घोष यांनी व्यक्त केलेल्या या मतावरुन विरोधकांनी आता हे वक्तव्य संवेदनशून्य असल्याची टीका केली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

प्रचंड उष्णता, भूक आणि पाण्याची कमतरता याचा फटका लॉकडाउनच्या काळात घरी चालत जाण्याचा निर्णय घेतलेल्या स्थलांतरित मजुरांना बसला आहे. सोमवारपासून देशभातील वेगवेगळ्या भागांमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार श्रमिक विशेष ट्रेनमध्ये एकूण ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. याचसंदर्भात बोलताना घोष यांनी, “काही दुर्देवी घटना नक्की घडल्या आहेत, मात्र त्यासाठी रेल्वे प्रशासनाला दोषी ठरवता येणार नाही. श्रमिकांच्या प्रवासासाठी रेल्वे त्याच्याकडून सर्वोत्तम सेवा देत आहे. काही जणांचे मृत्यू झाले आहेत पण ते वेगवेगळ्या घटनांमध्ये झाले आहेत,” असं मत व्यक्त केलं.

आणखी वाचा- … हे लवकर विसरता येणार नाही; मायावती यांचा नरेंद्र मोदींना चिंतन करण्याचा सल्ला

“प्रवाशांना मदतीची गरज असताना रेल्वेने कशाप्रकारे उत्तम प्रकारे काम केलं आहे याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. काही छोट्या घटना घडल्या आहेत मात्र त्यामुळे रेल्वेसेवा बंद करता येणार नाही,” असं खासदार असलेल्या घोष यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. घोष यांच्या या वक्तव्यावरुन पश्चिम बंगालमधील विरोधीपक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेस आणि माकपने (एम) (सीपीआय एम) आक्षेप नोंदवला आहे. भाजपा नेत्यांनी मजुरांना होत असणाऱ्या अडचणींबद्दल संवदेनशील असण्याची गरज आहे असं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे.

“करोना संकट आणि लॉकडाउनचे केंद्र सरकारने नीट नियोजन न केल्याने स्थलांतरितांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक लोकांचा मृत्यू होत आहे असं असतानाच भाजपा नेते अशापद्धतीचे उद्धट वक्तव्य करत आहेत जसं काही काही घडलचं नाही. आमच्याकडे बोट दाखवण्याआधी दिलीप घोष यांनी जरा संभाळून आणि नीट बोलावं,” असा टोला तृणमूलच्या खासदार सौगाता रॉय यांनी घोष यांना लगावला आहे.

आणखी वाचा- … पण हे पत्रही एकदा नक्की वाचाच; प्रियंका गांधींची मोदींना विनंती

माकपचे सदस्य मोहम्मद सलीम यांनीही रॉय यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. “घोष यांच्यासारखे नेते भाजपाच्या आभासी जगात राहत आहेत. ज्यांना भाजपाच्या काळात सर्व काही चांगले होत असल्याचं वाटत आहे. स्थलांतरितांच्या प्रश्नामुळे मोदी सरकार लोकांचे प्राण वाचवण्यात अपयशी ठरत असल्याचे सिद्ध झालं आहे. केंद्र सरकारमुळे गोंधळ निर्णाण झालेला असताना अशाप्रकारे दिशाभूल करताना भाजपा नेत्यांना लाज वाटली पाहिजे,” असं सलीम यांनी म्हटलं आहे.