अॅक्यूट एन्सेफिलायटिस सिन्ड्रोम अर्थात तीव्र मेंदूज्वराने बिहारमध्ये मोठे थैमान घातले असून या आजाराची लागण झाल्याने आत्तापर्यंत ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. या आजाराचा सर्वाधिक परिणाम मुझफ्फरपूर जिल्ह्यात पहायला मिळत आहे. लहान मुलांमध्ये या आजाराची झपाट्याने लागण होत असल्याने राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुझफ्फरपूर येथील श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ५८ जणांचा या आजाराची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर, केजरीवाल रुग्णालयात ११ जणांचा बळी गेला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुलांचाही समावेश असून त्यांना झपाट्याने लागणही होत आहे. या स्थितीवर भाष्य करताना बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे म्हणाले, ‘आम्ही सर्वजण लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. औषधांपासून डॉक्टरांची अधिकची कुमकही मागवण्यात आली आहे. पाटण्यातल्या एम्स रुग्णालयातूनही डॉक्टर आणि परिचारिकांना बोलावण्यात आले आहे.

या आजाराने उत्तर बिहारच्या सितामढी, शिवहर, मोतिहारी आणि वैशाली जिल्ह्यात सर्वाधिक थैमान घातले आहे. विविध रुग्णालयांध्ये या आजारावर उपचारांसाठी दाखल झालेली मुले याच जिल्ह्यांमधील आहेत. या जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना आणि प्रशासनाला रुग्णांना सर्व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिल्या आहेत.

अॅक्यूट इन्सेफेलायटिस सिन्ड्रोम आणि जपानी इन्सेफलायटीस या मेंदूज्वराला उत्तर बिहारमध्ये चमकी बुखार नावाने ओळखले जाते. याची लागण झालेल्या मुलांना तीव्र ताप येतो आणि शरीर अकडल्यासारखे होते. यानंतर मुलं बेशुद्ध होतात. त्याचबरोबर रुग्णाला उलटी होणे आणि चिडचिड होणे अशी लक्षणे दिसून येतात.