उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये विषारी दारुमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. या दोन राज्यात विषारी दारुमुळे आतापर्यंत ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मेरठमध्ये १८, सहारनपूरमध्ये ४६, रुरकीमध्ये २० आणि खुशीनगरमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४६ जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यातील ३६ जणांचा मृत्यू विषारी दारुमुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सहारनपूरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आलोक पांडे यांनी ही माहिती दिली.

आरोप-प्रत्यारोपाच्या फंदात पडणार नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करु असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विविध ठिकाणी छापे मारुन आतापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली असून २५ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. ४०० लिटर बेकायद दारु जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई अशीच सुरु रहाणार असल्याचे एसएसपींनी सांगितले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दारु प्याल्यामुळे अत्यवस्थ असलेल्यांना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.